assignments

मुलांनो
आजचा आपला विषय आहे ‘assignments ‘. हो तीच ती. तुम्हाला दर आठवड्याला अभ्यासा सारख्या फ़ालतू कामातून थोडा विरंगुळा मिळवून देणारी.
याला तुम्ही ‘प्रोजेक्ट’ सुद्धा म्हणु शकता. पण म्हणु नका. कारण मग त्या नावातली उपजत गम्मत आणि ‘सोय’ दोन्ही निघून जाईल. ‘assignment ‘ या नावातच ‘assign ‘ आहे.
म्हणजे सरांनी तुम्हाला ‘assign’ केली की तुम्ही तुमच्या आईला, बाबांना, किंवा तुम्हाला योग्य वाटेल अशा कोणत्याही व्यक्तीला ती assign करायची. कधी कधी अक्ख्या ग्रुप ला सुद्धा करू शकता.
पण ‘आई’ हीच ग्रुप लीडर असली पाहिजे हे विसरु नका. याला पुढील कारणे आहेत:
१. ownership : मुलाचं प्रत्येक प्रोजेक्ट आई स्वतःच समजुन करते. मुलाला त्या विषयाशी काही देण घेण असो अथवा नसों!
२. competitive spirit : आपल (म्हणजे मुलाच, पण एकदा ownership आली की…) प्रोजेक्ट दुसर्या मुलांच्या आयांपेक्षा जास्त चांगल झालेच पाहिजे ह्या जिद्दीने त्या काम करतात.
३. people management : प्रसंगी अक्ख्या घराला तय या noble cause मधे सामिल करून घेवू शकतात. (म्हणजे वेठीस धरु शकतात).

…..जोक्स अपार्ट! पण आजुबाजुच्या प्रत्येक शाळेत आज सर्वांगीण प्रगतीच जे खूळ संचारलाय त्यात ‘सब घोडे बारा टके’ हा न्याय चालू आहे. वेगवेगळ्या विषयांवरची मुलांच्या वयाला आणि कुवतीला न झेपणारी प्रोजेक्ट्स दर आठवड्याला माथी मारली जाताहेत. हे विषय पुरते समजलेले नसताना त्या आधीच प्रोजेक्ट्स ची धोंड गळ्यात पडते. अगदी इयत्ता पहिली पासून. ज्या मुलाची basic skills अजून विकसित व्हायची आहेत त्याला अशी प्रोजेक्ट्स देणे म्हणजे त्याच्यावर अन्याय आहेच. पण या अतिरेकामुळे त्याचा विषयातला रस कमी होण्याचच प्रमाण अधिक आहे. यात कुठल्या बोर्ड ची शाळा हे हल्ली महत्वाच राहिलेलं नाही. ‘अनुकरण’ एव्हढी एकच गोष्ट करत वेगवेगळ्या शाळा compete करतायत. ही प्रोजेक्ट्स मुलांपेक्षा पालकांसाठीच असावीत. किंवा तसं गृहीत असावं. अशा वेळी पालकांची अवस्था केविलवाणी होते. त्यातूनही सुशिक्षित, बदलत्या ‘technology ‘ शी संपर्क राखून असणार्या पालकांना काही गोष्टी सहज शक्य होतात. पण आज जो तो उठ सुठ मुलांना ICSC / CBSC / IB school मध्ये घालू पाहतोय. स्वतःच्या बुद्धीची कुवत आहे किंवा नाही हे न बघताच. अभ्यासक्रम काळाच्या पुढे धावतोय. त्यात भाषा हे महत्वाच माध्यम परकीय. त्यामुळे मूळ विषय समजताना मुलांची आणि पालकांची दोघांचीही दमछाक होतेय. त्यात वरून ही प्रोजेक्ट्स. कुठलाही विचार न करता आखलेली.
उ.दा. पहिलीतल्या मुलांना वेगवेगळ्या बियांचे नमुने गोळा करून त्यांची माहिती मिळवून तक्ता तयार करायला सांगणे. (इंग्रजीतून हे गृहीत)
बिया गोळा आम्हीही करत होतो. गुंजेच्या, बित्तीच्या. खेळता खेळता सहज शिक्षण खूप छान आणि तेही नकळत होत होत. पण याला जेव्हा ‘बाजारी’ स्वरूप येत तेव्हा मन अस्वस्थ होत.
मुलांना बिया गोळा करून आणायला सांगण त्याची माहिती त्याच्या पालकांनी त्याला करून देण इतपत ठीक. पण ती ‘सादर’ करायची. म्हणजे ‘packaging ‘ आलं. मग सगळ लक्ष माहिती सोडून सादारीकरणाकडे. आपला तक्ता सगळ्यात छान कसा दिसेल?
‘हा ठीक आहे. २-३ ओळीची माहिती पुरे झाली. इंटरनेटवर मिळेल’. बस द्यान हा विषय इथेच संपला.
पण आता ती मांडायची कशी? decoration कस करायचं? ह्यावर सगळा focus shift होतो.
यात मुलांची गुंतवणूक किती? कापणे चिकटवणे हे आधीच या इतक्या लहान मुलांना व्यवस्थित येत नसतं. आणि करायची उत्सुकता असेल तरी ‘नको रे, तो तक्ता खराब होईल..तुला नाही जमणार. ताई करेल नीट’ अस खच्चीकरण जास्त. म्हणजे माहिती काढायची बाबांनी, इंटरनेट वरून. बिया गोळा करणार आई. तक्ता सजवणार पुन्हा इतर कोणीतरी.
मुलांना त्यांच्या कुवतीप्रमाणे करता येईल अशी छोटी projects नकोत का? सगळ्यात उत्तम म्हणजे ती शाळेत शिक्षकांसमोर त्यांनी करावीत. त्यावर चर्चा (गप्पा..) आणि देवाण घेवाण व्हावी. चुरचुरीत गोष्टींची सजावट असावी. त्यातून मुलांना त्यांच्याही नकळत शिकता येईल. ह्या प्रोजेक्ट्सना मार्क नकोत कि grades नकोत. हवा तो मुलांचा सहभाग. (पालकांचा हवाच पण फक्त पालकांचा नको). आणि साहित्य गोळा करण्यापेक्षा द्यान गोळा करण्यावर भर.

2 comments डिसेंबर 23, 2009

ससा तो कसा!

ससा तो कसा कि कापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविली…
वेगे वेगे धावू नि डोंगरावर जावू हि शर्यत रे आपुली…

गोड गाणं. त्या दिवशी पिल्लू ला ऐकवत होते. पुढचे शब्द आठवेनात. म्हणून म्प३ मिळवून ऐकली. आणि चक्क एक आख्ख नवीन तत्वज्ञान सापडलं!
युरेका again .
ही गोष्ट मुलांना वर्षानुवर्ष सांगतोय न? slow but steady wins the race . बरोबर?
पण हल्ली जरा उलट होतंय. GT बियाणांच्या जमान्यात आहोत न. त्यामुळे कासवाचा steadiness , आणि सशाचा speed हे दोन्ही हवंय. आपल्याला ‘काससा’ हवाय. ‘सासव’ सुद्धा चालेल.
हे कूर्मगतीने जिंकण कालबाह्य होत चाललय. मुलं त्यामुळे confuse होत असावीत. moral of the story एक आणि प्रत्यक्षात काही वेगळंच. नाही?
जरा लक्ष देवून ऐकल गाणं तेव्हा हे दुसर कडवं ऐकलं आणि खजिना गवसल्याचा आनंद झाला मला.

‘हिरवी हिरवी पाने नि पाखरांचे गाणे हे पाहुनिया ससा हरखला…’
आपला हा ससा होता सुरवातीला जरा गर्विष्ठ. मान्य.
शर्यतीच आव्हान पण त्यानेच दिल. मान्य.
गाफील देखील राहिला तो. हेही मान्य.
लेकीन सफर का मजा तो उसीने लुटा बॉस! जिंकायचं कसं हे त्याला नाही कळलं. पण जगायचं कसं हे त्याने शिकवलं!

आपल्या सशांना या शर्यतीत धावताना आपल ध्येय गाठताना कासवाची चिकाटी तर शिकवायलाच हवी पण त्याहून महत्वाचं हेही शिकवायला हवं कि ‘winning is not always important .’ ध्येयाकडे वाटचाल करताना त्या वाटेतला आनंद भरभरून घेता आला पाहिजे. पाखराचं गाणं ऐकता आलं पाहिजे. काही क्षण स्पर्धा विसरून झाडाच्या सावलीत निजता आलं पाहिजे.
आणि आम्हाला तुम्हाला ती सावली होता आलं पाहिजे.

2 comments डिसेंबर 8, 2009

जगायचं कसं? तुम्हीच ठरवा

कालचा दिवस वेगळा होता.  वाटल होत नेहमीप्रमाणे एक टिपिकल personality development  टाईप च ट्रेनिंग असेल.  मोठ्या मोठ्या गप्पा. आणि मग इकडून तिकडे गेले वारे…
पण कालच ट्रेनिंग वेगळ होत. ट्रेनिंग नव्हतच ते.  फक्त गोष्टीच गोष्टी होत्या. आयुष्याकडे नव्याने पाहायला शिकवणाऱ्या.
आजपर्यंत नजरेतून सुटून गेलेल्या अनेक छोट्या छोट्या गोष्टींचा समूह.  बाकी त्यातून काय घ्यायचं ते तुम्ही ठरवा.
आयुष्यातल्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीवर हिरीरीने मत मांडणार्या (शब्दांचे फवारे उडवणार्या) आणि आपल्यावर कसा अन्याय होत आलाय हे प्रत्येक अपयशाच्या क्षणी गिरवत राहणार्या सगळ्यांनाच (आणि आपल्या पैकी प्रत्येक जण कधी न कधी असतोच तसा) खडबडून जाग करणार avis च अमोघ वक्तृत्व. त्याच्या पोतडीतून एका मागोमाग एक खजीन्यासारख्या बाहेर पडणार्या गोष्टी!
त्याचा
कळकळीचा प्रश्न:
सियाचीन च्या थंडीत काकडत duty  करणारा सैनिक जेव्हा त्याच्या तंबूत परत येवून २-२ तास उकळत्या पाण्यात पाय ठेवून स्वतःला जगवत ठेवतो, तेव्हा त्याच्या आयुष्यात कुठे असतो न्याय आणि अन्याय?
जेव्हा निव्वळ एक धड ( हो हात पाय नसणार केवळ धड!) म्हणून जन्माला येवूनही Nick Vujicic स्वाभिमानाने आयुष्य जगायचं ठरवतो तेव्हा त्याच्या आयुष्यात कुठे असतो न्याय आणि अन्याय?  
 
या आणि अशा प्रत्येक गोष्टीसाहित मनात रुंजी घालत होती पाडगावकरांची कविता. ‘जगायचं कस, तुम्हीच ठरवा..’!
पेला अर्धा सरला आहे असंही म्हणता येत…
पेला अर्धा भरला आहे असंही म्हणता येत
सरला आहे म्हणायचं कि भरला आहे म्हणायचं तुम्हीच ठरवा.
 
या पेक्षा जास्त सुंदर ट्रेनिंग कुठल असणार. 
 
जगायचं कसं? तुम्हीच ठरवा.

6 comments डिसेंबर 4, 2009

मुक्त

दिवसांची थडगी बांधून त्यांना दरवर्षी फुलं वाहून काहीच होत नसतं.
अजून काही फुलं तेव्हढी दूर होतात त्यांच्या आईपासून…हि सुद्धा हिंसाच.

आम्ही बांधलीयेत अशी थडगी जागोजागी
स्वातन्त्र्यदेवतेचा आत्मा व्हीव्हळतोय आत आत.
जखमा वाहतायत भळभळून, मिळेल त्या छीद्रातून.
अशीच थडगी बांधत राहिलो तर कधी या देशाचं स्मशान होईल
ते सांगताही येणार नाही.

जाळून श्राद्ध देखील घालू नका त्याचं.
आत्मे शांत होतात दहावं बारावं करून याचा पुरावा तरी कुठे आहे?
कावळे घास तेव्हढा गिळून जातील,
आणि त्या दिवसांचे अतृप्त आत्मे पुन्हा पुन्हा जन्माला येत राहतील.

मुक्तच करायचं असेल त्यांना तर सूड घ्या त्यांच्या बळीचा.
आपापल्या परीने.
कुठलाही गाजावाजा न करता…शत्रू सावध ह्यायला नको!
मुक्त होतील ते तेव्हाच आणि शांत होऊ आपणही.
——————————————————————–

२६ नोव्हेंबर २००८ च्या हुतात्म्यांना माझा सलाम आणि श्रद्धांजली.
आणि त्यांच्या आहुतीमुळे ज्यांची आयुष्य आजही शाबूत आहेत त्या सगळ्या जिवंत माणसांना एकच विनंती.
“अशा दिवसांच्या जखमा ओल्या राहू द्यात तुमच्या मनात. त्या भरून देवू नका. पण या दिवसाचं media-करण थांबवा. “

9 comments नोव्हेंबर 26, 2009

एव्हढ जमेल? आपल्यापैकी प्रत्येकाला?

एकीकडे महाराष्ट्र नावाच्या आपल्या ‘नावाला न जागणार्या’ राज्यात प्रत्येक छोट्या आणि मोठ्या गोष्टीवरून निरर्थक वाद चालू असताना, आपल्या देशाचे पंतप्रधान मात्र अमेरिके सारख्या (अजूनपर्यंत तरी) महासत्ते समोर भारताची विविध विषयांवरची भूमिका अतिशय चातुर्याने आणि खंबीर पणे मांडत आहेत..
कुठे आपल भाषिक स्वार्थी राजकारण, त्यावरून दिवाणखान्यात रंगणार्या चर्चा आणि कुठे आपल्या पंतप्रधानांचं रोख ठोक विधान :” काश्मीर च्या सीमा पुन्हा आखण्याचा प्रश्नच येत नाही’
कुठे आपल २६/११ च्या घटनेच किळस आणणार राजकारण आणि कुठे त्यांच निर्भीड वक्तव्य: ” We should not harbour any illusions that a selective approach to terrorism , tackling it on one place while ignoring it in others, will work”.

कुठे आहोत आपण? जगासमोर आपले पंतप्रधान आपल्या देशाची समर्थ भूमिका निर्भय पणे, भारताच्या अस्मितेला कुठेही धक्का न लागू देता मांडत आहेत. हे करताना देखील त्यांना या सत्याची पूर्ण जाणीव आहे कि अमेरिकेला आपली आणि आपल्याला अमेरिकेची गरज आहेच. Doller च वर्चस्व निर्विवाद पणे मान्य करत ते एकीकडे अमेरिकेचा इगो तर सांभाळत आहेतच पण त्याच बरोबर भारत प्रगतीपथावरच्या देशांचे हक्क पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली विसर्जित करणार नाही हेही स्पष्ट करत आहेत. ह्या परिस्थितीत (नव्हे एरवी देखील) आपण केवळ ‘भारतीय‘ असायला नको का?

आपण मात्र देशआधी विचार करतो आपल्या धर्माचा, धर्माआधी आपल्या जातीचा, आणि आपापल्या सोयी प्रमाणे आपल्या भाषेचा. आपला पोकळ अभिमान आपल्याला कुठेही पोचवू शकत नाही.
या भ्रष्ट व्यवस्थेचे भाग बनून राहण्यात आणि कुठल्यातरी मसीहा ची वाट पाहण्यात आपण आपली सोयीची पळवाट आणि तात्पुरती सुरक्षा शोधली आहे. आपण म्हणजे एरवी असामान्य म्हणवून घेवू पाहणार्या सामान्य जनतेने. आपण म्हणजे बहुसंख्य शहरी मध्यमवर्ग. सगळ्यात पळपुटा. सगळ्यात बुद्धिवादी सुद्धा.
आपण धन्यता मानतो ते राजकारण्यांचे, फिल्म स्टार्स चे, क्रिकेट चे, आणि media चे उथळ मथळे आणि सवंग चर्चा पाहण्यात. आत आत जावून कधी करणार विचार? आपल्याला अभिमान दुसर्याच्या कर्तुत्वाचा. शिवाजी जन्माला यावा तो दुसर्याच्या घरात. तेही ठीक. पण निदान स्वतःच्या घरात एक मावळा तरी घडवायचा प्रयत्न करणार आहोत का आपण? मावळा म्हंजे ‘मराठी माणूस’ असा संकुचित अर्थ इथे अभिप्रेत नाही. मावळा प्रतिक आहे, निष्ठेच, प्रामाणिक पणाच, शौर्याचं, झोकून देण्याच. ही निष्ठा असावी फक्त देशाच्या प्रती. कुठलाही संकुचित भाषिक, प्रांतिक, धार्मिक राजकारण ज्या निष्ठेला धक्का लावू शकणार नाही अशी निष्ठा.
जपान मधली एक गोष्ट आठवते. राखेतून
उभा राहिलेला हा देश. निव्वळ राष्ट्राभिमान, आणि चिकाटीच्या जोरावर.
तेथील नागरिकांना एका पत्रकाराने एक प्रश्न विचारला : “देशातल्या राजकारणाचा, भ्रष्ट व्यवस्थेचा, नोकरशाहीचा तुमच्यावर परिणाम होत नाही का? तुम्ही अस्वस्थ होत नाही का?”
यावर तिकडच्या नागरिकांनी दिलेलं उत्तर खूप समर्पक आहे: “आम्ही या negative गोष्टींचा मूळी विचारच करत नाही. फक्त स्वतःच काम मात्र पूर्ण प्रामाणिक पणे आणि निष्ठेने करतो”
आणि प्रत्येक जपानी नागरिक जर हे करत असेल तर मुठभर भ्रष्ट लोकांच कितीस फावणार? शेवटी एकत्रित परिणाम हा प्रगतीकाराकच असणार न?
किमान एव्हढ तरी जमेल का कधी आपल्याला? आपल्यापैकी प्रत्येकाला?
शेतकऱ्यापासून, कामगारापासून, हवालदारापर्यंत.
कारकुनापासून, कचरेवाल्यापासून, शिक्षकापर्यंत.
व्यापार्यापासून, संशोधाकापासून, डॉक्टर-engineer पर्यंत,
ट्राफिक पोलिसापासून, कारखानदारापासून, सैनिकापर्यंत.
नगरसेवकापासून, पत्रकारापासून, मुख्यमंत्र्यांपासून, पंतप्रधानांपर्यंत!

2 comments नोव्हेंबर 24, 2009

conspiracy

हल्ली हे अस का होत कळत नाही. खूप काही लिहावसं वाटत. पण तो टेम्पो च येत नाही. इतक्या विषयांची गर्दी असते आजू बाजूला. पण कोणताच विषय आवडत नाहीये सध्या. तशी माझी मत खूप strong आहेत बर्याच विषयांच्या बाबतीत. कधी कधी जरा अतीच. पण हल्ली हल्ली खूप गोंधळायला होतंय. म्हणजे प्रत्येक गोष्टीला दोन किंवा अनेकदा दोनपेक्षा जास्तच बाजू असतात. आणि कधी कधी सगळ्याच बाजू पटतात देखील. म्हणजे राज ठाकरे ची मुलाखत बघितली कि त्याचं पटत. मग एखाद सुंदर संपादकीय वाचलं, ठाकरे आणि अबू आजमी special , की त्यांचा anti Raj view सुद्धा पटतो. आणि मग त्यावर पुन्हा एखाद प्रत्युत्तर असतंच. ते पण त्याच्या जागी योग्य वाटत. हल्ली हे सगळ्याच बाबतीत होत. Too much information is enough to confuse and at times paralyse a person ’s thought process !
युरेका….exactly हेच करतय media आणि आपले politicians .
जनतेची विचार करण्याची क्षमता. त्यावर ह्यांचं सगळ अस्तित्व अवलंबून आहे. तिच्यावरच हल्ला करायचा. कधी लोकांना अशिक्षित ठेवून, कधी त्याना आमिष दाखवून आणि कधी त्यांना दिशाहीन करून. आणि ही conspiracy समजत असूनही आपण दिशाहीन होण पसंत करतो हे त्याहूनही भयानक सत्य आहे.
कारण एक दिशा धरून शेवटपर्यंत वाटचाल करणं हे दिशाहीन असण्यापेक्षा खूप कठीण आहे. आणि हे तुमच्या आमच्या पेक्षा त्या धूर्त लांडग्यांना चांगलच माहित आहे. याला म्हणतात public ची नस ओळखण!

8 comments नोव्हेंबर 18, 2009

कानफाट्या

मी office मधे बसून माशा मारतेय.
काम जास्त नाहिये. cyclone warning मुळे कही लोकं घरी गेली आहेत. जावं की न जावं हा मला पडलेला पेच आहे. कारण warning आल्यापासून बाहेर बघतेय, पावूस तर सोडाच, पण झाडाच पान सुद्धा हलत नाहिये. हे असं नेहमी का होतं हे कळत नाही. एखाद्या दहशतवादी संघटनेने हल्ला आयत्या वेळी cancel करणे; होम मिनिस्टर ची डरकाळी एइकुन, हे समजू शकते.

पण हवामान म्हणजे काही अल-कायदा नाही. हल्ली हल्ली या गोष्टी मला जीवनाच्या अति महान तत्वद्यानाकडे घेउन चालल्या आहेत. म्हणजे अणु-रेणू ला पण आत्मा असतो वगैरे. प्रत्येक वेळी मेट जे जाहिर करत ते याला कळत असणार. आणि ह्याचे बेत हा आयत्या वेळी बदलत असणार. (हा म्हणजे हवामान)

खर तर आपलं मेट डिपार्टमेन्ट हल्ला थोपवू शकतच नाही. फार तर फार , आणि अगदी कहर म्हणजे यंत्रणा थोडी कामाला लागते नेहमीपेक्षा जास्त. एव्हढच. म्हणजे कधीतरी प्रोजेक्ट fire वर असल्यावर सगळे मनातून उसना आव आणून वीकएंड ला काम करतात तस!(यालाच मग sincere, hard-working, pro-active वगैरे म्हणुन appraisal मधे गौरवण्यात येत) आणि हे त्यालाही माहितेय. तरी मग हल्ला cancel का करत असेल तो?
कारण मग ह्याच क्रेडिट कमी होतं न. अचानक ‘भोँक’ करून भाम्भेरी उडवण्याचा आनंद official लपाछुपी च्या खेळात नसतो! ‘मला माहित होतं तू असाच करणार ते…’ असं आपण बोललो की त्याचा ego भयंकर दुखावला जात असणार. शेवटी आपण सुद्धा त्याच्यावर इतके बेसावध वार केलेत आतापर्यंत, की त्याचा अधिकार सिद्ध करून दाखवण्याशिवाय त्याच्या कड़े तरी काय पर्याय आहे म्हणा.
anyways , पण एव्हढ मात्र खरं,
MET department always comes into picture when the situation is already met . एकदा कानफाट्या नाव पडल की हे असं असतं.

7 comments नोव्हेंबर 11, 2009

ओळख

ओळखीच्या वाटेवरून इतक्या वर्षांनी चालताना
अनोळखी दिसलं बरच काही.
अनोळखी होतं मला सुद्धा हे असं अपराधी वाटणं
कधी काळी मित्र असलेल्या या सगळ्या खुणांना नव्याने भेटणं.
डोळ्यात त्यांच्या बरच काही लपलेलं
काहीस माझ्यातल खुपलेलं आणि बरच काही आमच्यामधलं जपलेलं

सगळेच असे अंतर राखून अवघडलेले असताना तो दगड मात्र थेट पायात घुसला.
कच्चकन एक शिवी हासडून पाहिल तेव्हा हीही ओळख जुनीच निघाली

याच वाटेने शाळेत जाताना यालाच रोज नेमाने भिरकावून द्यायचो उंच
तो चाखायाचा चव आभाळाची आणि माझ्या जिभेवर रेंगाळायची आंबट गोड चिंच.

माझ्या शिवीवर त्यानेही ऐकवली एक भारीतली ओवी.
माझा चेहरा कळ्वळलेला,
त्याचाही हळहळलेला
“रोज नव्या आभाळात उडायला लागल्यावर विसरलास मला लेका?”
भिराकाव ना मला पुन्हा एकदा उंच!

बरेच दिवस झाले तुला सुद्धा चिंचा खावून…”

2 comments ऑक्टोबर 16, 2009

शिम्पले

बर्याच वर्षांनी गोव्याला गेले लॉन्ग वीक एंड ला. आणि चक्क समुद्राकाठी शंख शिम्पले वेचले. वेड्यासारखे. एकेका लाटेबरोबर वाहत यायचे. सगळे वेचून जपून ठेवलेत. आत्या म्हणाली यात जीव असतो…

मला ‘आठवणी’ आठवल्या. त्या पण अशाच असतात. कुठल्यातरी लाटेबरोबर वाहत येतात. वेचायला सुरुवात केली की थाम्बताच येत नाही. किती रंग, किती आकार. काही टोकरी, अगदी रक्त काढतात. आणि काही स्वतःताच कोंदाळं करून गुरफटून बसतात…लाटेवर लाट किनार्यावर फुटत राहते. नविन नविन आठवणी वाहून आणत! आणि आपण वेचत राहतो. आणि हो, त्यांच्यात सुद्धा जीव असतो..शिम्पल्यांसारखा.

7 comments ऑक्टोबर 7, 2009

गुराढोरांनो…

शशि थरूर यांनी economy क्लास ला गुराढोरांचा डबा म्हटलं!

Congress ने जाहिर निषेध व्यक्त केला.

आता थरूर साहेब सुद्धा जाहिर माफ़ी मागतील.

सगळं कसं पारदर्शक!

एक निषेध, प्रतिमा वाचवण्यासाठी. आणि मग मीडिया चा धुराळा.
त्याने थरूर साहेबांचे डोळे चुरचुरतील. त्यातून पाणी येइल.  त्याला आम्ही वेड्या जनतेने पश्चातापाचे अश्रू समजायचे?

प्रश्न उरतोच.
त्यांना जे वाटल ते वाटायचं बंद होइल?
आम्हाला माहीत नव्हत अस नाही…पण
आमच्या सारख्या असंख्य economy क्लास ने प्रवास करणार्या भारतीयांना आमचे नेते ‘गुरं ढोरं’ समजतात हे एव्हढ्या क्रूरपणे सांगण्याची गरज होती?
 प्रामाणिक नेता तो हाच!

ते सांगणं जेव्हढं क्रूर नाही तेव्हाढ़ ते वाटणं आहे. कारण ते या पुढेही वाटत राहणार आहे. आणि अशांच्या हातात या गुरा ढ़ोरांच्या नाकातल्या वेसणीची दोरी आहे.

ऐकताय ना? गुराढोरांनो?

4 comments सप्टेंबर 17, 2009

Previous Posts


नवं काही जुनं काही

माझ्या कविता...

Blogs I Follow

Blog Stats

तुम्हाला काय वाटतं?

साठवणीतलं

Email Subscription

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Top Rated