काहीतरी लिहायचच अस म्हणत जेव्हा कीबोर्ड हातात घेतला तेव्हा
शब्द इकडे तिकडे सैरावैरा पळत सुटले
विचारांची फजिती बघत खो खो हसत सुटले आणि
खिजवत राहिले वाकुल्या दाखवत
नाचवत राहिले डोळ्यापुढे नेहमीचीच
झाडं बिड  , फुलं पानं , चंद्र तारे, रंग बिंग
लपवत राहिले त्यांच्या आड
प्रेम बीम, वेडी स्वप्न , ठसठसणारी दुःख बिक्ख
गोंधळलेली बोट नाचत राहिली या दगडावरून त्या दगडावर
उमटलेल पुसत काही आणि पुसलेल पुन्हा उठवत…

जेव्हा जेव्हा हे असे सगळे फितूर होतात तेव्हा तेव्हा
एकटेपणा एकटाच तेव्हढा प्रामाणिक राहतो माझ्याशी!

कविता सुद्धा तेव्हाच सुचतात म्हणे
हळव्या, गहन , आर्त बिर्त…

जपून ठेवूया…

जपून ठेवूया पूल थोडे तुझ्या माझ्या नजरेचे
एकमेकांच्या मनात उतरायची वेळ कधी आलीच तर?

जपून ठेवूया उब थोडी आपापल्या हातातली
एकमेकांना पंखाखाली घ्यायची वेळ आलीच तर?

जपून ठेवूया वाट थोडी एकमेकांची बघण्याची
कारणाशिवाय जगण्याची वेळ कधी आलीच तर?

तेव्हा भेटूच.

‘तेव्हा भेटूच.’ Kavita published in MisalPav Diwali ank 2012:
http://www.misalpav.com/diwali2012/tevha_bhetuch
 
रसरशीत तापलेल्या सोनेरी झळीतल्या आणि
ओल्या निसरड्या फसव्या घळीतल्या

कात टाकणार्‍या रंगीत पानगळीतल्या आणि
गर्दीने नटलेल्या बाजारातल्या आळीतल्या

निरव चांदण्यात निपचित पहुडलेल्या आणि
काळ्याभोर रेषेत क्षितीजाला भिडलेल्या

सगळ्या सगळ्या वाटांवरून सोबत चालतानासुद्धा
वाट बघणं मात्र संपत नाही
मी तुझी, तू अजून कुणाची…

पण या सगळ्या वाटा मिळतात तिथे त्या मुक्कामाला
मला खात्री आहे,
मीच पोचेन तुझ्या आधी, आणि तुही येशीलच कधीतरी

तेव्हा भेटूच.

Herbarium

एक पुस्तक आहे
आपण दोघांनी मिळून लिहिलेलं
मोजकीच पान आहेत
आणि प्रत्येक पानावर मोजकीच अक्षर
विखुरलेली
शब्द होण्याची वाट बघत थांबलेली…
आणि एक पान सुद्धा जपलेल, जाळीदार

बरेच दिवस बुकशेल्फ मध्ये पडून आहे
त्याच कव्हर अजून तसच आहे, नितळ
सोनेरी अक्षर लुकलुकतात धुळीच्या पडद्यामागून

एरवी कोण हातात घेणार ते ,इतरांसाठी नव्हतच ते कधी
अर्थ तरी कसे लागायचे त्यांना अर्ध्या मुर्ध्या अक्षरांचे…
शब्द बांधायचे राहिले नसते आपले तर
एक तरी कविता फुललीच असती त्या पिंपळपानावर,
नाही?

२१-१२-२०१२

आज काही संपणारच असेल तर
संपू दे किल्मिष एकेका मनातलं

संपू दे वखवख, हव्यास, आणि अनावर भूक
संपू दे असूया, मत्सर, आणि वांझोटा अहंकार
संपू दे पाठलाग सोन्याच्या हरणाचा
ज्याची वाट जाते रावणाच्या असुरी महत्वाकांशेकडे
एक दिवस जळून संपण्यासाठी

संपू दे दरी तुझ्या-माझ्यातली आणि ‘त्याच्या’तली
आणि सापडू दे कस्तुरी आपापल्या आतली.

आज काही संपणारच असेल तर
संपू दे किल्मिष एकेका मनातलं

२१-१२-२०१२

नागीण

डोहाचा तळ आज शांत शांत होता. कुठलीच खळबळ नव्हती. काळीजर्द नागीण वेटोळ घालून स्वस्थ पडून होती. खरे तर आतून आतून ती आज जरा जास्तच अस्वस्थ होती. आजूबाजूला असली जीवघेणी निश्चल शांतता असली की नको ते विचार थैमान घालत तिच्या डोक्यात. विष ग्रंथी जड वाटू लागत; भरल्या भरल्या सारख्या. आजही तसाच अजून एक दिवस. वांझोटा. तिची चीड चीड होत होती. त्या ऋषीची वाणी कानात घुमत होती. वारंवार वाटत होत की त्याने अमरत्वाचा वर द्यायलाच नको होता. अमरत्व घेऊन काय करायचं नुसत? चिरतारुण्याचा आशीर्वाद द्यायला मुनिवर विसरले. आता म्हातारपणात मरणाची वाट भागण्याची देखील सोय नाही. पूर्वीसारखी ताकद राहिली नाही, दरारा राहीला नाही. मेल्यातच जमा अस्तित्व. गोळा होऊन पडून राहायचं. रागाने तिने शेपटी आपटली आणि धुसफुसत निपचित पडून राहिली…

“आई, मी नेहा  कडे जातेय, कदाचित तिकडेच राहीन. परवा submission आहे.”
“नक्की कामच करणार आहात न दोघी? घरी एकटीच नाहीये न ती?
“आई sss तू कधी पासून संशय घ्यायला लागलीस ग? I mean आजपर्यंत कधीच असाल काही विचारलं नाहीस मला तू.”
“सहज गम्मत ग”
“मी तुला आज ओळखते? निखील बद्दल ऐकल्यापासून डोक्यात भुंगा शिरलाय न तुझ्या?”
“तसं नाही.  हे वयच आहे तसं. काळजी वाटते.”
“निखील नेहाचा boyfriend आहे. पण तिच्या आईपेक्षा तुला जास्त काळजी.”
“तुला काय जात थट्टा करायला.”
“आणि समजा, मी पण असा कोणी पंजाबी वगैरे धरून आणला तर??”
“धरून? असा कोणीही धरून आणू नकोस बाई. विचार करून निर्णय घे काय तो. मी आणि तुझे बाबा तसे काही जुनाट विचारांचे नाही आहोत. तुला माहित आहे. जाती-पाती मानत नाही आम्ही. पंजाबी,बंगाली, कोणीही असू दे. नीट शिकलेला समजूतदार असला कि झालं. फक्त अगदी आनी-पानी आणू नकोस हा कोणी. जय भीम वगैरे… पाहिलेयास का कोणी तर सांग वेळीच. ”
“नाही ग बाई. उगाच बोलले. आता दिवसभर विचार करत बसशील. बर चाल बये. मला उशीर होतोय. आणि हो, नेहा ची आई आहे घरी. काळजी करू नकोस. बाय.”
___________________________________________________________

नाही नाही म्हणता नागिणीच्या कानात आईचं शेवटच वाक्य पडलंच. डोळे किलकिले करत ती हलकेच हसली, छद्मी. का Konas ठाऊक तिला तिचे जुने दिवस आठवले. विषग्रंथी  जरा जास्तच जड भासल्या आणि विष जास्त जहरी.

___________________________________________________________

“नमस्कार, मी आदिती देशपांडे, आपली बातमी मध्ये आपल स्वागत करते. केंद्रीय मंत्रिमंडळाने घटनेत दुरुस्ती करुन अनुसूचित जाती व जमातींना सरकारी नोकऱ्यांमधील पदोन्नतीत आरक्षण देण्याचा निर्णय घेतलाय. त्या बद्दल समाजात वेगवेगळ्या थरात क्काय प्रतिक्रिया उमटल्या आहेत ते जाणून घेऊया. मी सध्या आहे टिळक कॉलेज च्या प्रांगणात. आणि माझ्या बरोबर आहेत उद्याच्या भारताचे काही प्रतिनिधी…
अभिजित , काय वाटत तुला या निर्णयाबद्दल?”
“नमस्कार, मी अभिजित काळे. मला वाटत हा निर्णय फक्त राजकीय स्वार्थ साधण्यासाठी घेतलाय. आधीच वेगवेगळ्या ठिकाणी आरक्षणामुळे लायक उमेदवारांच्या संधी कमी होतायत. त्यात आता बढती साठी सुद्धा हा निकष म्हणजे देशःच्या प्रगतीला खिल बसवण्याचा उद्योग आहे….”
“नमिता..तुझ काय मत आहे?”
“मी नमिता शेट्ये. मला वाटत समाजाच्या काही घटकांना आजही डावलल जातंय त्यामुळे हा निर्णय गरजेचा आहे. पण त्याची अंमलबजावणी बद्दल खात्री वाटत नाही. या आधीही हा मुद्दा फक्त मतांसाठी वापरला गेलाय. नाहीतर एव्हाना आरक्षणाची गरज संपली असती. त्यातही मग OBC न वगळल. अस का? उद्या मराठा म्हणतील आम्ही का नको?”
“अभिजित..”
“मला वाट्त सगळीकडूनच हे आरक्षण काढून टाकायला हव. कुठल्याच फोरम वर जात वगैरे विचारायची नाही. फक्त योग्यता हा एकाच निकष हवा. तरच आपली प्रगती होईल.”
“धन्यवाद अभिजित, नमिता. तर आपण बगःत आहातच तरुणांच्या प्रतिक्रिया. आता वेळ झालीये एका छोट्याशा ब्रेंक ची. कुठेही जाऊ नका…”

___________________________________________________________

नागीण कूस बदलून पुन्हा वेटोळ घालून बसली. वर वर दिसत नसली तरी ती आतून उकळत होती. अभिजित समोर असता तर कदाचित तिच्या विषारी फुत्काराचा दाह त्याला जाणवला असता. नागिणीच्या डोळ्यात उतरलेलं रक्त बघायला आस पास कोणीच नव्हत.

___________________________________________________________

“हाय”
“हाय”
“इतक्या रात्री online ?”
“मुद्दाम आलो. तुला सांगायला. कि आज आमच्या कॉलेज मध्ये news channel चे लोक आलेले. मला कवर केलंय.
“wow , hero झाला असशील मग कॉलेज मध्ये.”
“उद्या “आपली बातमी” बघ. लागतो न तुमच्या कडे?”
“अरे तुझ्यासाठी घेईन मुद्दाम bro. नाहीतर Youtube वर टाक. तिकडे बघेन. बर अभी ऐक.”
“बोल”
“fb वर आत्याने ckp club तयार केलंय. मी invite पाठवते.”
“अरे great . लगेच पाठव. आता दादाला matrimony site वर जायला नको. ;-)”
“LOL . हो आपल्या सगळ्या CKP मैत्रिणींना सांग जॉईन करायला. ”
“होहो done . ”
“एक solid article share केलंय, शिरीष कणेकरांच. “आम्ही कोण म्हणुनी काय पुसता” . CKP खाण्याबद्दल अस काही लिहिलंय न..”
“अरे मग आपल्या खाण्याची सर नाही ग मिळणार कुठे….बटव उद्या नक्की बघ. आणि invite पाठव लगेच. आता झोपतोय. bye”
“bye ”

___________________________________________________________

नागिणीच्या डोळ्यातला लाल रंग मावळताना कोणी पहिला कि नाही माहित नाही, पण तिला मगाच्पेक्षा बरंच बर वाटत होत. तिला ब-याच वेळानंतर फणा काढून आजूबाजूला बघावस वाटल. फणा काढून, तिने जीभ जरा मोकळी केली आणि एक मनमोकळा फुत्कार टाकला. आजूबाजूचं पाणी विषारी झाल्याची तिला तशी पर्वा नव्हतीच. आणि मुनीवरांच्या आशीर्वादामुळे कोणी तिला काही इजा करायला धजावेल याची भीती सुद्धा नव्हती.
तिच्या विषग्रंथी मघा पेक्षा जरा हलक्या झाल्याचा तिला भास झाला.

___________________________________________________________

डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही अशा मिट्ट काळोखातून, पुरुषभर वाढलेल्या कापून काढणा-या गवतातून चिखल तुडवत ते धावत होते. तिच्या इभ्रतीची लक्तर त्यांच्या डोळ्यादेखत टांगलेली. आक्रोश गोठलेला, डोळे थिजलेले.
सैतानाची भूक इतक्या सहज संपती तर तो सैतान कुठला. तय्न्च्या डोळ्यादेखत तलवारी परजल्या गेल्या. उरल्या सुरल्या ताकदीनिशी हिसडा देऊन ते जीव घेऊन पळत सुटले शेताच्या दिशेने. तीच मागे काय झाल , काय होणार होत ते वेगळ कळण्याची गरज नव्हतीच. जे तीच झाल तेच किंवा त्याहून बह्यंकर काहीतरी त्याचं होऊ घातलं होत. चारी बाजूने गिळायला आलेला अंधार आणि नियतीने रोखलेले भेसूर डोळे. शेवटचे त्राण संपत आले तेव्हा त्या अंधारातही दिसली चारी बाजूने तळपणारी पाती. मंग्याचा चिरलेला गळा. सपासप वार झाले. अक्खा गाव झोपलेला असताना एक भेसूर किंकाळी अंधार चिरत गेली. आणि मग मेंदू बधीर करणारी शांतता…

गडचिरोली जिल्ह्यातील दलित हत्याकांड प्रकरणी ४ संशयितांची निर्दोष सुटका करण्यात आली. पुराव्या अभावी आणि साक्षीदार पुढे न आल्यामुळे गुन्हा शाबित होऊ शकल्या नसल्याच न्यायालयाच म्हणण आहे. उर्वरित दोघांना ४ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. बहुजन कल्याण परतीच्या कार्यकर्त्यांनी आज राज्यभरात रस्त्यावर उतरून तीव्र निदर्शन केली…बकाप च्या अध्यक्षांनी सरकार जातीयातावादी असल्याचा आरोप केला आहे….”

“त्याच त्याच बातम्या ऐकून कंटाळा कसा येत नाही हो तुम्हाला? चला आता जेवायला. आईने पातोळे पाठवलेत. आवडतात तुम्हाला म्हणून…. आमच्याकडचे पातोळे तुमच्या गोव्यापेक्षा वेगळे असतात जरा. ब्राह्मणांच्यात खोबर घालत नाहीत…”

_________________________________________________

नागिणीने उसळी घेत एक दीर्घ फुत्कार टाकला. आनंदातिरेकाने ती विक्राळ हसली.
डोह ढवळून निघालेला आणि तीच विष पाण्यात बेमालूम मिसळलेल.  .
खवळलेल पाणी हळू हळू शांत झाल. तळाशी वेटोळ घालून मनाशीच हसत ती पुन्हा शांत पडून राहिली; मुनिवरांनी तिला दिलेला अमरत्वाचा आशीर्वाद आठवून आणि ते साधण्यासाठी मोठ्या दूरदृष्टीने त्यांनी पृथ्वीवरच्या क्षुद्र जीवांना दिलेला शाप सुद्धा.

फोटो

आजही केव्हढा जिवंत दिसतोय तुझा चेहरा!

तुझी sunshine smile ;
सकाळी माझ्या खिडकीतून फक्त माझ्यासाठी येणा-या कोवळ्या उन्हासारखी

आणि आपल्या मधल्या कॅमेराला बेदखल करत थेट माझ्या डोळ्यात आरपार बघणारे डोळे

आपण एकमेकाला बेदखल करण्या आधीच्या दिवसातला आहे ना हा फोटो?

झालं होत फक्त एवढंच

आज यातलं काहीच दिसलं नाही
रस्ते, खड्डे
धूर, धूळ,
घाण, चिखल
बातम्या, पोस्टर्स

आज यातलं काहीच खुपलं नाही
गजर, बडबड
कलकल, आवाज
ह्याची चरबी
त्याचा माज

आज यातलं काही झालंच नाही
चिडचिड वैताग
धांदल, गडबड
त्रागा, तगमग
तडफड, कडकड
.
.
.
झालं होत फक्त एवढंच,
कालचा दिवस संपताना
तू माझ्या आणि मी तुझ्या मनावर अलगद हात ठेवला होता.

उसवून…

उसवून वीण निखळून गेलेत किती क्षण
बिलगून राहिलेत काळजाला
जाणा-या काळाला पुढे पाठवून

आता वर्तमानाची ठिगळ लावून शिवावी लागते काळाची गोधडी रोज

अपूर्ण

ब-याच दिवसांनी भेटतो आपण
आणि बराच वेळ जातो शब्दाला शब्द जुळवण्यात
गुंतलेल्या दो-याची टोक शोधण्यात
निघायची वेळ होते कधी कळत नाही

मग परत एकदा हरवून जायचं
जगलेले आणि न जगलेले ते सगळे क्षण गोळा करण्यात
बोलायचे आणि सांगायचे ते सगळे शब्द गोळा करण्यात
तुझ्या डोळ्यात वाचलेलं आठवून आठवून मनावर गोंदून ठेवण्यात
पुढच्या भेटी साठी…

काही नाती फक्त अपूर्ण असण्यासाठीच असतात का रे?