Archive for the ‘ ट ला ट फ ला फ… ’ Category

झालं होत फक्त एवढंच

आज यातलं काहीच दिसलं नाही
रस्ते, खड्डे
धूर, धूळ,
घाण, चिखल
बातम्या, पोस्टर्स

आज यातलं काहीच खुपलं नाही
गजर, बडबड
कलकल, आवाज
ह्याची चरबी
त्याचा माज

आज यातलं काही झालंच नाही
चिडचिड वैताग
धांदल, गडबड
त्रागा, तगमग
तडफड, कडकड
.
.
.
झालं होत फक्त एवढंच,
कालचा दिवस संपताना
तू माझ्या आणि मी तुझ्या मनावर अलगद हात ठेवला होता.

निःशब्द

तुझे म्हणावे तुझेच केवळ

असे काही एक माझे निव्वळ

 

कुणी म्हणाले तिथेच बनती

जुळती तुटती रेशीमगाठी

मी न पाहिले हात तयाचे

तुझ्या किनारी सापडले घर

 

आयुष्याच्या अंक पटावर

दिले घेतले हिशेब झाले

समर्पणाच्या वाटेवरचे 

आज पडावे पहिले पाउल

 

उलगडताना ह्रदयाची  धून

सूर कापरा कातर कातर

शब्दांची वीण उसवीत जाती 

शब्दांवाचून डोळ्यांचे तळ

 

 तुझे म्हणावे तुझेच केवळ

असे काही एक माझे निव्वळ

तुला जमावे मला जमावे

तुला जमावे मला जमावे
त्रास जीवाचे सोडून देणे
डोळ्यामधल्या पाण्यालाही
जमून जावे वाहून जाणे

दोन मनांच्या मधले अंतर
आहे केवळ टोचत राहणे
कसे कळावे खुळ्या मनाला
निवडुंगाचे बहरून येणे

भास जगाचे खासच फसवे
त्यात जडावे दुर्धर रुसवे..
ओठांवरचे शब्द गरिबडे
श्वासागणती खडतर होणे

आठवणींचे गुलाब हळवे
नको उशाशी काटे जपणे
निर्माल्याचे प्राक्तन घेउनी
जन्मा यावे आपले जगणे

कढई

काय काय दिसत तुला त्या एव्हढ्याशा कढईत
तापण, चरचरण, तडतडण, धुमसण, घुसळण …
सगळे चटके सोसत पुन्हा बेमालूम मिसळण
तरी कोण एकाशिवाय सगळा तोल ढासळण
माझ्यापर्यंत पोचतो फक्त दरवळ भरून पावलेला
तृप्तीचा मंत्र छोट्या कढईत मावलेला…

हेवा वाटतो मला सुद्धा तुझ्या न दिसण्याचा.
कढईची किनार माझ्या सोनेरी करण्याचा
सोसन्यातल सोन पहायला तुझ्याकडून शिकावं
डोळसपणे सगळ्यांनीच थोडं आंधळ असावं

तुझ्या जगाला…

तुझ्या जगाला आहे माझे उधार काही देणे
श्वासांच्या बदल्यात द्यायचे सौंदर्याचे लेणे.

साठवलेले डोळ्यामधले इंद्रधनुचे बिंब
आणि काही श्रावणातल्या आठवणींचे थेंब

रेशीम गाठी शब्दांच्या अन गंधफुलांच्या साथी
अपूर्ण बेसूर काही तराणे, काही सुरेल नाती

फसव्या वाटेवरले काही दीपस्तंभ अज्ञात
त्यांच्यासाठी काही प्रार्थना अन जुळलेले हात

जेजे निर्मळ, पवित्र, सुंदर घे त्याची आहुती
जेजे हलकट, पतित, किल्मिष जळेल तेते पाठी.

ध्यास

खोल तळाशी डोहाच्या
दुष्ट कालिया बसलासे
तरी यमुनेच्या मायेची
कृष्णाला का ओढ असे
जहरी त्याचे श्वास जरी
तो काळाचा फास जरी
शाम त्यासही मुग्ध करी
ही मुरलीची जादुगिरी

देवकीच्या त्यागाची कथा
अन राधेच्या वेडाची
द्रौपदीच्या चिंधीत वाचली
गोष्ट मीरेच्या नादाची
अवखळ तो घनश्याम जरी
चंचल अन बदनाम जरी
तोच विहरतो चरोचरी
ही प्रेमाची मुशाफिरी

कवच कुंडलांचा मानी
शूर धनुर्धर अभिमानी
तेजःपुत्र तो अन दानी
तरीही शापित अपमानी
मोजून आणले श्वास जरी
असंख्य शत्रू ज्ञात जरी
दिले नियतीला वचन तरी
ही भिडण्याची जात खरी

अंधारातून प्रवास हा
फसवे चकवे पदोपदी
विश्वासाची वाट निसरडी
अपयश हसते फिदीफिदी
आपले असणे भास जरी
अगणित चिंता त्रास जरी
ह्रिदयी जगणे पेरीत जावे
फुलवीत जावे स्वप्न उरी

कशी मस्त जिरली !

रात्रभर हुंदडून हुंदडून चंद्राने सॉलिड मस्ती केली.
ते पाहून सूर्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली

राग अनावर आळवत सुटला
भाजत पोळत जाळत सुटला

झाडाने मग आणला वारा
ढग्गोबाने आणल्या गारा
पाण्याचाही केला मारा
तरी ह्याचा वरच पारा

आगीच्या या कल्लोळाला पृथ्वी मात्र पुरून उरली
समुद्रात बुडवून ह्याला म्हणते कशी मस्त जिरली

अधांतरी

तुझ्या माझ्या नात्याला मापायचं कसं
पिंडी वरल्या  सापाला शापायचं कसं
 
श्वासाभोवती आवळणारा विळखा सुटता सुटत नाही
निळ जहर जाळत जात पण थंड स्पर्श पेटत नाही
भिनत जात नसानसात तरी तहान आटत नाही
विषामधलं  अमृत आता जपायचं कसं
 
तुझीसुद्धा आग आग माझी देखील लाही लाही
अंधाराच्या डोहाला या तळ नाही अंत नाही
अन जळणा-या चांदण्याला अवसेचीही  खंत नाही
अधांतरी नात असं झेपायच कसं
 
तुझ्या माझ्या नात्याला मापायचं कसं
पिंडी वरल्या  सापाला शापायचं कसं

चंद्र आणि कवी

कुतूहलाने ग्रासलेला एक कवी चंद्रावर गेला
आणि थोड्याच वेळात दोघांचाही भ्रमनिरास झाला.

चंद्र म्हणाला माझ्या आयुष्यात फक्त पोकळी आहे भरलेली
कवी म्हणाला तुझ्या चांदण्याने आमची आयुष्य भारलेली

चंद्र म्हणाला माझ जिण डागाळलेल, व्यर्थ, वांझ
कवी म्हणाला तुझ्या साक्षीने जुळली मने फुटले बांध

कवी म्हणाला तुझ्या भराने उसळे सविता
तुझ्या स्फूर्तीने जगले प्रेमी, जगल्या कविता
तुझे चांदणे पिऊन घ्यावे, ओढून घ्यावा तुझा गारवा
मालकंस हा तुझीच चाहूल, श्वासामध्ये तुझा मारवा

चंद्र म्हणाला मी एक अपघात, मी आहे उपेक्षित
कवी म्हणाला मलाही नव्हतं हे असलं काही अपेक्षित

चंद्र म्हणाला मी निस्तेज, मोताद एकेका किरणाला
कवी म्हणाला कस्तुरी तशी नसतेच ठावूक हरणाला!

चंद्र चकित, गोंधळलेला, कवी देखील काहीसा तसाच
माझी लेखणी नाचवणारा रुप्याचा रुपया तो हाच?
प्रत्येक सुंदर मंगल क्षणाला माणस ठेवतात ह्याला साक्ष
मान्य नव्हत मला, हा असेल असा खडबडीत आणि रुक्ष!

हिरमुसलेला कवी म्हणाला, “चल मला आता निघायला हव.”
चंद्र म्हणाला “मी ही येतो, मला आता आरशात बघायला हव”

अंधार

हसर्या जखमा बिनदिक्कत भळभळणार्या
मुक्या वेदना मुक्त मोकळ्या कळवळणार्या
काळ्या शाईत विरघळणारे खारट पाणी
बुजर्या स्पर्शामधून फुलती प्रेम निशाणी
काळोखाच्या पदरामागे दिवाभितांना आश्रय, अवसर
कुठे बंद डोळ्यातून वाहती चिंता आशा स्वप्न निरंतर
लपती चिंध्या, लपती ठिगळे;
काळे गोरे समान सगळे,
अंधाराच्या मिठीत अवघे मिटले अंतर
पूर्व दिशेला पुन्हा उलगडे सोनसळी पट, सुंदर सुंदर…