Archive for the ‘ मुक्तछंद ’ Category

काहीतरी लिहायचच अस म्हणत जेव्हा कीबोर्ड हातात घेतला तेव्हा
शब्द इकडे तिकडे सैरावैरा पळत सुटले
विचारांची फजिती बघत खो खो हसत सुटले आणि
खिजवत राहिले वाकुल्या दाखवत
नाचवत राहिले डोळ्यापुढे नेहमीचीच
झाडं बिड  , फुलं पानं , चंद्र तारे, रंग बिंग
लपवत राहिले त्यांच्या आड
प्रेम बीम, वेडी स्वप्न , ठसठसणारी दुःख बिक्ख
गोंधळलेली बोट नाचत राहिली या दगडावरून त्या दगडावर
उमटलेल पुसत काही आणि पुसलेल पुन्हा उठवत…

जेव्हा जेव्हा हे असे सगळे फितूर होतात तेव्हा तेव्हा
एकटेपणा एकटाच तेव्हढा प्रामाणिक राहतो माझ्याशी!

कविता सुद्धा तेव्हाच सुचतात म्हणे
हळव्या, गहन , आर्त बिर्त…

Advertisements

रात्र

डोळ्यातला चंद्र
आणि मनातला अंधार घेऊन

सत्याचे भास झेलत
स्वप्नांच्या उंबरठ्यावर

निद्रेची वाट बघत
ताटकळत उभी होती रात्र

माझा सुद्धा डोळा लागला नाही ती झोपेपर्यंत.

निर्णय

घट्ट मिटलेल्या  डोळ्यापुढे अस्वस्थ अंधारात

रंगीढंगी चित्र-विचित्र विक्षेप करत नाचत राहिल्या आकृत्या

लहानाच्या मोठ्या आणि मोठ्याच्या लहान होत

ठेंगा दाखवत दात विचकत हसत राहिल्या आकृत्या 

 

कान मुद्दाम बंद केले होते हात बांधून कानाशी

एका दगडात पाडून टाकले चिवचिवणारे दोन पक्षी

तरी राहिले आदळत आवाज भित्र्या भिंतींना भेदून  

शिरत राहिली नको ती कुजबुज पडदे सगळे छेदून

 

पापण्यांच्या फटीतून तेव्हाच शिरली असह्य तिरीप 

अंधार पिऊन फाकणारी

आणि कानावर पडली चाहूल जरा वेगळी

जरबेने पाउल टाकणारी

 

मीच बंद केलेल दार उघडलं कोणी की 

एक दार बंद केल्यावर आपोआप उघडलीत दुसरी?

डोळे उघडून एकदा तरी पाहायलाच हव…

अर्घ्य

हव्या हव्याशा वाटणा-या रत्नांना
नकोनकोशा वाटणा-या लहरी वाहून नेतात
मागे ठेवून जातात एक काळपट तवंग
आणि पेरून जातात काही नवीन रत्न; खिजवायला
कुणा तिस-याच्या किना-यावरून खेचून आणलेली.

त्याच किना-यावर त्याच लहरींना
आज वाह्तोय हे अर्घ्य न गवसलेल्या मोत्याचं
श्रद्धा म्हणून नाही,
वेचणा-याच्या प्राक्तनाची लाचारी
आणि खेचणा-याच्या नशिबाची मुजोरी
संपवण्याचा एक प्रयत्न म्हणून.

गुपित

हे चिमुरड रोप दिवसभर आकाशाकडे तोंड करून काहीतरी बोलत राहतं
ती भली मोठी निळी छत्री त्याच्याच मालकीची जणू
ते सुद्धा खुशाल गोंजारतं त्याची सगळी गुपितं,
हळूच दडवतं आपल्या पांढ-या शुभ्र दाढीत.
आणि रात्री आपल्या प्रेमळ हातांनी झोके देत निजवतं त्याला अलगद.
सकाळी उठून हे वेड पोर त्या छत्रीकडे बघून तोंडभर हसतं
कोणास ठाऊक काय चालत दोघांच आपल्या आपल्यात…

पण रोज सकाळी मला दिसते माझी बाग फुललेली!

सुटका

सूर्याची जरा अधिकच फाकलेली किरणं.
जणू सुटकेच्या प्रयत्नात.
पण ब-याचदा ती समाधानी दिसतात
कैदेतल माफक स्वातंत्र्य उपभोगताना
उमटत जातात खुणा कधी कधी त्यांच्या बंडाच्या
प्रकाशाच्या सावल्या जशा,
आणि मग संध्याकाळी घाई घाईने ती गोळा करतात सगळ्या सावल्या
आणि बांधून नेतात पुन्हा ,
नकोच पुरावा त्यांच्या बंडाचा, किंवा साध्या कुजबुजण्याचा सुद्धा.

त्या सगळ्या सगळ्या सावल्यांमध्ये माझी सुद्धा सावली दिसते
माझ्यातून फाकलेल्या धगधगणा-या, पोळलेल्या, किरणांसकट
तेव्हा समजते निरर्थक धडपड,
किरणांची नव्हे तर सूर्याची
स्वतःपासून सुटण्याची!

गुलमोहोर

तापलेल्या डांबराच्या एकलकोंड्या रस्त्यावर तुला उभं पाहिलं
पोळणा-या वा-यावर, त्या आगीच्या गोळ्याशी एकरूप होताना
तुझी सावली सुद्धा तेव्हा झाली होती लालबुंद, निखा-यासारखी.
तू असा जळत उभा होतास
आणि ते मात्र तुझ्यात बघत होते
नखशिखांत बहरलेला गुलमोहोर

Advertisements