Archive for the ‘ ललित ’ Category

नागीण

डोहाचा तळ आज शांत शांत होता. कुठलीच खळबळ नव्हती. काळीजर्द नागीण वेटोळ घालून स्वस्थ पडून होती. खरे तर आतून आतून ती आज जरा जास्तच अस्वस्थ होती. आजूबाजूला असली जीवघेणी निश्चल शांतता असली की नको ते विचार थैमान घालत तिच्या डोक्यात. विष ग्रंथी जड वाटू लागत; भरल्या भरल्या सारख्या. आजही तसाच अजून एक दिवस. वांझोटा. तिची चीड चीड होत होती. त्या ऋषीची वाणी कानात घुमत होती. वारंवार वाटत होत की त्याने अमरत्वाचा वर द्यायलाच नको होता. अमरत्व घेऊन काय करायचं नुसत? चिरतारुण्याचा आशीर्वाद द्यायला मुनिवर विसरले. आता म्हातारपणात मरणाची वाट भागण्याची देखील सोय नाही. पूर्वीसारखी ताकद राहिली नाही, दरारा राहीला नाही. मेल्यातच जमा अस्तित्व. गोळा होऊन पडून राहायचं. रागाने तिने शेपटी आपटली आणि धुसफुसत निपचित पडून राहिली…

“आई, मी नेहा  कडे जातेय, कदाचित तिकडेच राहीन. परवा submission आहे.”
“नक्की कामच करणार आहात न दोघी? घरी एकटीच नाहीये न ती?
“आई sss तू कधी पासून संशय घ्यायला लागलीस ग? I mean आजपर्यंत कधीच असाल काही विचारलं नाहीस मला तू.”
“सहज गम्मत ग”
“मी तुला आज ओळखते? निखील बद्दल ऐकल्यापासून डोक्यात भुंगा शिरलाय न तुझ्या?”
“तसं नाही.  हे वयच आहे तसं. काळजी वाटते.”
“निखील नेहाचा boyfriend आहे. पण तिच्या आईपेक्षा तुला जास्त काळजी.”
“तुला काय जात थट्टा करायला.”
“आणि समजा, मी पण असा कोणी पंजाबी वगैरे धरून आणला तर??”
“धरून? असा कोणीही धरून आणू नकोस बाई. विचार करून निर्णय घे काय तो. मी आणि तुझे बाबा तसे काही जुनाट विचारांचे नाही आहोत. तुला माहित आहे. जाती-पाती मानत नाही आम्ही. पंजाबी,बंगाली, कोणीही असू दे. नीट शिकलेला समजूतदार असला कि झालं. फक्त अगदी आनी-पानी आणू नकोस हा कोणी. जय भीम वगैरे… पाहिलेयास का कोणी तर सांग वेळीच. ”
“नाही ग बाई. उगाच बोलले. आता दिवसभर विचार करत बसशील. बर चाल बये. मला उशीर होतोय. आणि हो, नेहा ची आई आहे घरी. काळजी करू नकोस. बाय.”
___________________________________________________________

नाही नाही म्हणता नागिणीच्या कानात आईचं शेवटच वाक्य पडलंच. डोळे किलकिले करत ती हलकेच हसली, छद्मी. का Konas ठाऊक तिला तिचे जुने दिवस आठवले. विषग्रंथी  जरा जास्तच जड भासल्या आणि विष जास्त जहरी.

___________________________________________________________

“नमस्कार, मी आदिती देशपांडे, आपली बातमी मध्ये आपल स्वागत करते. केंद्रीय मंत्रिमंडळाने घटनेत दुरुस्ती करुन अनुसूचित जाती व जमातींना सरकारी नोकऱ्यांमधील पदोन्नतीत आरक्षण देण्याचा निर्णय घेतलाय. त्या बद्दल समाजात वेगवेगळ्या थरात क्काय प्रतिक्रिया उमटल्या आहेत ते जाणून घेऊया. मी सध्या आहे टिळक कॉलेज च्या प्रांगणात. आणि माझ्या बरोबर आहेत उद्याच्या भारताचे काही प्रतिनिधी…
अभिजित , काय वाटत तुला या निर्णयाबद्दल?”
“नमस्कार, मी अभिजित काळे. मला वाटत हा निर्णय फक्त राजकीय स्वार्थ साधण्यासाठी घेतलाय. आधीच वेगवेगळ्या ठिकाणी आरक्षणामुळे लायक उमेदवारांच्या संधी कमी होतायत. त्यात आता बढती साठी सुद्धा हा निकष म्हणजे देशःच्या प्रगतीला खिल बसवण्याचा उद्योग आहे….”
“नमिता..तुझ काय मत आहे?”
“मी नमिता शेट्ये. मला वाटत समाजाच्या काही घटकांना आजही डावलल जातंय त्यामुळे हा निर्णय गरजेचा आहे. पण त्याची अंमलबजावणी बद्दल खात्री वाटत नाही. या आधीही हा मुद्दा फक्त मतांसाठी वापरला गेलाय. नाहीतर एव्हाना आरक्षणाची गरज संपली असती. त्यातही मग OBC न वगळल. अस का? उद्या मराठा म्हणतील आम्ही का नको?”
“अभिजित..”
“मला वाट्त सगळीकडूनच हे आरक्षण काढून टाकायला हव. कुठल्याच फोरम वर जात वगैरे विचारायची नाही. फक्त योग्यता हा एकाच निकष हवा. तरच आपली प्रगती होईल.”
“धन्यवाद अभिजित, नमिता. तर आपण बगःत आहातच तरुणांच्या प्रतिक्रिया. आता वेळ झालीये एका छोट्याशा ब्रेंक ची. कुठेही जाऊ नका…”

___________________________________________________________

नागीण कूस बदलून पुन्हा वेटोळ घालून बसली. वर वर दिसत नसली तरी ती आतून उकळत होती. अभिजित समोर असता तर कदाचित तिच्या विषारी फुत्काराचा दाह त्याला जाणवला असता. नागिणीच्या डोळ्यात उतरलेलं रक्त बघायला आस पास कोणीच नव्हत.

___________________________________________________________

“हाय”
“हाय”
“इतक्या रात्री online ?”
“मुद्दाम आलो. तुला सांगायला. कि आज आमच्या कॉलेज मध्ये news channel चे लोक आलेले. मला कवर केलंय.
“wow , hero झाला असशील मग कॉलेज मध्ये.”
“उद्या “आपली बातमी” बघ. लागतो न तुमच्या कडे?”
“अरे तुझ्यासाठी घेईन मुद्दाम bro. नाहीतर Youtube वर टाक. तिकडे बघेन. बर अभी ऐक.”
“बोल”
“fb वर आत्याने ckp club तयार केलंय. मी invite पाठवते.”
“अरे great . लगेच पाठव. आता दादाला matrimony site वर जायला नको. ;-)”
“LOL . हो आपल्या सगळ्या CKP मैत्रिणींना सांग जॉईन करायला. ”
“होहो done . ”
“एक solid article share केलंय, शिरीष कणेकरांच. “आम्ही कोण म्हणुनी काय पुसता” . CKP खाण्याबद्दल अस काही लिहिलंय न..”
“अरे मग आपल्या खाण्याची सर नाही ग मिळणार कुठे….बटव उद्या नक्की बघ. आणि invite पाठव लगेच. आता झोपतोय. bye”
“bye ”

___________________________________________________________

नागिणीच्या डोळ्यातला लाल रंग मावळताना कोणी पहिला कि नाही माहित नाही, पण तिला मगाच्पेक्षा बरंच बर वाटत होत. तिला ब-याच वेळानंतर फणा काढून आजूबाजूला बघावस वाटल. फणा काढून, तिने जीभ जरा मोकळी केली आणि एक मनमोकळा फुत्कार टाकला. आजूबाजूचं पाणी विषारी झाल्याची तिला तशी पर्वा नव्हतीच. आणि मुनीवरांच्या आशीर्वादामुळे कोणी तिला काही इजा करायला धजावेल याची भीती सुद्धा नव्हती.
तिच्या विषग्रंथी मघा पेक्षा जरा हलक्या झाल्याचा तिला भास झाला.

___________________________________________________________

डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही अशा मिट्ट काळोखातून, पुरुषभर वाढलेल्या कापून काढणा-या गवतातून चिखल तुडवत ते धावत होते. तिच्या इभ्रतीची लक्तर त्यांच्या डोळ्यादेखत टांगलेली. आक्रोश गोठलेला, डोळे थिजलेले.
सैतानाची भूक इतक्या सहज संपती तर तो सैतान कुठला. तय्न्च्या डोळ्यादेखत तलवारी परजल्या गेल्या. उरल्या सुरल्या ताकदीनिशी हिसडा देऊन ते जीव घेऊन पळत सुटले शेताच्या दिशेने. तीच मागे काय झाल , काय होणार होत ते वेगळ कळण्याची गरज नव्हतीच. जे तीच झाल तेच किंवा त्याहून बह्यंकर काहीतरी त्याचं होऊ घातलं होत. चारी बाजूने गिळायला आलेला अंधार आणि नियतीने रोखलेले भेसूर डोळे. शेवटचे त्राण संपत आले तेव्हा त्या अंधारातही दिसली चारी बाजूने तळपणारी पाती. मंग्याचा चिरलेला गळा. सपासप वार झाले. अक्खा गाव झोपलेला असताना एक भेसूर किंकाळी अंधार चिरत गेली. आणि मग मेंदू बधीर करणारी शांतता…

गडचिरोली जिल्ह्यातील दलित हत्याकांड प्रकरणी ४ संशयितांची निर्दोष सुटका करण्यात आली. पुराव्या अभावी आणि साक्षीदार पुढे न आल्यामुळे गुन्हा शाबित होऊ शकल्या नसल्याच न्यायालयाच म्हणण आहे. उर्वरित दोघांना ४ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. बहुजन कल्याण परतीच्या कार्यकर्त्यांनी आज राज्यभरात रस्त्यावर उतरून तीव्र निदर्शन केली…बकाप च्या अध्यक्षांनी सरकार जातीयातावादी असल्याचा आरोप केला आहे….”

“त्याच त्याच बातम्या ऐकून कंटाळा कसा येत नाही हो तुम्हाला? चला आता जेवायला. आईने पातोळे पाठवलेत. आवडतात तुम्हाला म्हणून…. आमच्याकडचे पातोळे तुमच्या गोव्यापेक्षा वेगळे असतात जरा. ब्राह्मणांच्यात खोबर घालत नाहीत…”

_________________________________________________

नागिणीने उसळी घेत एक दीर्घ फुत्कार टाकला. आनंदातिरेकाने ती विक्राळ हसली.
डोह ढवळून निघालेला आणि तीच विष पाण्यात बेमालूम मिसळलेल.  .
खवळलेल पाणी हळू हळू शांत झाल. तळाशी वेटोळ घालून मनाशीच हसत ती पुन्हा शांत पडून राहिली; मुनिवरांनी तिला दिलेला अमरत्वाचा आशीर्वाद आठवून आणि ते साधण्यासाठी मोठ्या दूरदृष्टीने त्यांनी पृथ्वीवरच्या क्षुद्र जीवांना दिलेला शाप सुद्धा.

mind book

आयुष्य साधं, सरळ, अगदी सोपं नाही पण फार अवघडही नाही म्हणता येणार. थोडी फार वळण अंगवळणी पडलेली. दुखण, खुपण, कधी पेपर कठीण जाणं, दोन चार मार्कांनी कधी पहिला तर कधी शेवटून दुसरा नंबर चुकण, प्रेमात पडण्या आधीच एखाद दुसरा प्रेमभंग होण, कधी आनंदाचे लहान मोठे धक्के, अनपेक्षित pramotion , विकेंड होम, पुढे जावून एखादा झेपेल इतपत आजार बिपी किंवा डायबेटीस सारखा, सचिन travels बरोबर युरोप किंवा गेला बाजार निदान मलेशिया टूर करता येईल इतका managable . बाय पास म्हणजे डोक्यावरून पाणी. ब-यापैकी काळजी घेणारी मुलंबाळ लेकीसुना. यात फारसा बदल नसतोच ९० टक्के सर्वसामान्य आणि सर्वमान्य आयुष्यांमध्ये, मुलांची नाव, आणि घरातलं interior सोडून.
त्यामुळे उरलेल्या १० टक्क्यात आपण कधी असू, वरच्या किंवा खालच्या टोकाला, अस मुळात कधी वाटतच नाही. डोळे दिपवणार यश, पैसा, प्रसिद्धी आणि उध्वस्त करणारी निराशा, अपयश, कंगाली या दोन्ही साठी देवाने आपल्याला घडवलेलच नाही ही पक्की धारणा असतेच. extremities साठी आपण कधीही ready नसतो.
अशा वेळी, आयुष्याबद्दल कमालीचे गाफील असताना, एरवी आपल प्रतिबिंब वाटावं इतकं सारखं, किंवा जाता जाता रस्त्यात ओळखीच कोणी भेटावं इतक्या सहज एखाद वेगळ आयुष्य भेटत तेव्हा भांबावून जायला होत. आणि ब-याच नव्या गोष्टींची ओळख होते, आणि काही जुन्या गोष्टींची ओळख पार बदलून सुद्धा जाते.
घराच्या खिडकीच्या काचेत न जाणवणार प्रतिबिंब आपण अवचित नोटीस करतो. ते असतंच नेहमी पण जाणवत क्वचित. आणि बाहेरच्या जगाला, दूरच्या दिव्यांना बेमालूम मिसळत असं काही उभं राहत की.. आरशापेक्षा खूप वेगळ. आरसा म्हणजे एका बाजूने हेतू पुरस्सर आंधळा केलेला. इथे मात्र सगळ दिसत आर पार, आतल्यासहित.

तशाच भेटल्या madam . संबंध खरा तर मोजक्या मिटींग्स पुरता. कधी एकदा प्रोजेक्ट संपतंय अशा मनस्थितीत आम्ही. पुढे जाऊन भेटू न भेटू. भेटलो तरी ठीक, नाही तरी ठीक. त्यामुळे बाय म्हणत तसं सोपं. अशा या शेवटच्या दिवशी काम संपवून शिळोप्याच्या गप्पा मारता मारता जे जे काही उलगडत गेलं ते फक्त प्रेरणा देणार नव्हत. एकेका चेह-यामागे एकेक मोठा ग्रंथ असतो (face -book ?) , एकेका ह्रिदयाच्या तळाशी एकेक समुद्र असतो हे दाखवणार होत.
जे आयुष्य मी सहज ९० टक्क्यात गणलं होत ते उरलेल्या १० टक्क्यातल होत. cancer ग्रस्त. सर्वसामान्य वाटणा-या अशा या व्यक्तीने किती पदर उलगडून दाखवले म्हणून सांगू? वयाच्या चाळीशीत, केमो च्या दुस-या दिवसापासून MBA च्या प्रोजेक्ट मध्ये झोकून देण असो, डोक्याला रुमाल बांधून बँकेच्या promotion च्या परीक्षेला जाणं असो, सगळाच धक्के देणार.
अशी चिवट माणसं पहिली नव्हती असं नाही. आजाराशी झुंज देणारी पाहिली होती, त्यातून बरी होत आयुष्य पूर्ववत जगणारी पाहिली होती. आणि त्या अहंकारात आजारी दिवसांच्या सुरस गोष्टी सांगणारी सुद्धा पाहिली होती. पण हे वेगळ होत. या आजाराने या व्यक्तीचा जगण्याचा दृष्टीकोन पूर्ण बदलला होता. उरलेल्या आयुष्यात आजार उलटण्याची भीती नव्हती. इतर patients ना उभारी देण्याचा आटापिटा होता.
मीच का ? या प्रश्नच उत्तर त्यांनी शोधलं होत. “मीच कारण आजवर मी आयुष्य एकतर गृहीत धरल किंवा रडत आणि तक्रारी करण्यात वाया घालवलं म्हणून मी.”
“जगणार असेन तर या race मध्ये धावायचं मला” हि clarity होती.
पूर्वीच्या सगळ्या धिक्कारलेल्या, विस्कटलेल्या, फिस्कटलेल्या गोष्टी, माणस, भेद फक्त ‘आपल्याहून वेगळे’ (वेगळे, वाईट नाही) म्हणून पाहील्या लागल्यावर येणारी विशालता spiritual वाटायला लागली. हेही कदाचित फार वेगळ नसेल, वाचलं होत, पाहिलं होत, ऐकल होत. पण पुन्हा तेच. फार सहजपणे मी ते आयुष्य ९० टक्क्यात मोजलं होत. काहीही आधार नव्हता त्याला. फक्त perception . त्या क्षणी जाणवलं कि त्या मला वाटल्या त्याहून फार वेगळ्या आहेत. आणि अशी कितीतरी असतील वेगळी. आपण ९० टक्क्याच लेबल डकवलेली.
साधी सरळ सोपी आणि तरी असामान्य.
प्रत्येक ओळख facebook वर जतन करणारे, जोखणारे आपण. ब-याचदा त्या बुक च एकही पान न उलगडता like -unlike आणि comment करणारे.
अशा सगळ्या ९० टक्के वाल्यांचं एखाद mindbook मिळेल?

घुबड होणार?

एक होता काऊ आणि एक होती चिऊ. त्याचं चाललं होत मजेत; नेहमीचीच भांडण, रोजचेच हेवेदावे, धडे शिकवण, आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या.

आणि एक होता पोपट, एक साळुंकी सुद्धा. दिवसभर त्याची पोपटपंची आणि तीच कर्णकर्कश किंचाळण. त्या पलीकडे पोचाव अशी इच्चा नाही आणि खंतही नाही. पिंजा-यात नसून पिंजा-यातच जगणारे काहीसे.

मग एक कबुतर का नसाव? तेही होत. उबेजलेल्या वळचणीला बसून दिवसभर घुमायच, आणि घोग-या आवाजात कसलीशी भुणभुण करत रहायची.

कोणाला दिसत नसली तरी जिच्या नजरेतून कोणीही सुटत नसे अशी एक घार सुद्धा होती; उंच आभाळात. पण त्याचा उपयोग एक तर स्वतः च्या पिल्लांपुरता किंवा एखाद सावज हेरायला. बाकी तिच्या सगळ दिसण्याशी तिच्या पलीकडल्या जाणिवांचा काहीच संबध नाही.

तिथेच तळ्याच्या कडेला एक बगळा कसा दिसला नाही तुम्हाला! त्याचाही नेहमीचाच उद्योग; संन्याशाचा आव आणून ताव मारायचा.

आणि एक घुबड सुद्धा होत. अंधा-या ढोलीत डोळे बंद करून बसलेल. सगळ्यांपेक्षा वेगळ. कुरूप, अशुभ हि सगळी ठेवलेली नाव कोळून प्यायलेल. सगळ्यांच सगळ शांतपणे शोषून घ्यायचं. चेह-यावर त्याचा कुठली पुरावा दिसत नाही. फक्त दिसत नाही कि तो मुळातच असत नाही? स्थितप्रज्ञ कि काय ते. डोळ्यात काही उमटण्याचा प्रश्नच नाही. ते आत आत पाहण्यात व्यग्र. अंतर्मुख.
आणि रात्री मात्र सगळे गाढ झोपी गेल्यावर कोणालाही न दिसणार बराच काही पाहायचं.

आपण सगळेच थोडे थोडे पक्षी असतो. आपापल्या आकाशात उडणारे, आपापल्या घरट्यात राहणारे, आपल्या आपल्या पिल्लांना दाणा भरवणारे. कोणी कधी कोण व्ह्यायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न.

पण सगळ्यांनी थोड थोड घुबड नक्की व्हावं. नाही?

जगजीत सिंग. माझ्यापुरते..

प्यार का पहला ख़त लिखने में वक़्त तो लगता है
नए परिंदों को उड़ने में वक़्त तो लगता है
जिस्म की बात नहीं थी उनके दिल तक जाना था
लम्बी दूरी तै करने में वक़्त तो लगता है.
*******

वो ख़त के पुरजे उड़ा रहा था, हवाओ का रुख दिखा रहा था..
वो उम्र कम कर रहा था मेरी, मै साल अपने बढ़ा रहा था
*******

मेरी जिंदगी किसी और की, मेरे नाम का कोई और है
मेरा अक्स है सरे आईना, बस आईना कोई और है
*******

किसको आती है मसीहाई किसे आवाज दू?
दूरतक फैली है तनहाई किसे आवाज दू?
*******

लोग जालिम है हर एक बात का ताना देंगे, बातो बातोमे मेरा जिक्र भी ले आयेंगे
उनकी बातोका जरासा भी असर मत लेना, वरना चहरे के तासुर से समझ जायेंगे
चाहे कुछ भी हो मुलाकात न करना उनसे
मेरे बारेमे कोई बात न करना उनसे…बात निकलेगी तो फिर दूर तलक जाएगी
*******
शेहेद जिने का मिला करता ही थोडा थोडा, जाने वालो के लिये दिल नाही थोडा करते…
*******

आग का क्या है पल दो पल में लगती है, बुझते बुझते एक जमाना लगता है
*******

किती किती आणि काय काय आठवायचं? एकेका ओळीवर जीव ओवाळून टाकण्याच्या दिवसात जो आवाज हे सगळ थेट हृदयापर्यंत पोचवत होता तो आता नाही..
दिसणा-या शब्दांना न दिसणारा आत्मा देणारा आवाज आता नाही.
कधी नुसताच शांत बसलेल असताना, कधी कामाच्या गडबडीत दहा गोष्टींची यादी काढताना, कधी सिग्नलवर गाडी थांबलेली असताना खिडकी बाहेरच्या कोलाहलाला बाहेरच थोपवताना
कधी पोळ्या लाटताना, कधी अनुष्काला थोपटत निजवताना, कधी ऑफिस मध्ये मान मोडेपर्यंत काम करत नाईट मारताना, कधी रस्त्यावरची एखादी चांगली मुलगी नवा-याला किंवा मित्राला दाखवताना, कधी पेपर मधली हृदय पिळवटून टाकणारी बातमी वाचताना…
बरेच क्षण आयुष्यातले फक्त आपण एकटेच जगात असतो, आपल्य्पुरते, फक्त आपण. जगाला दिसत असतो आपण मोठ्ठ्या घोळक्यात किंवा भारी गडबडीत. पण त्याच वेळी आपल्या आत आपण एक वेगळाच क्षण जगत असतो, त्याचं आणि आपलं अस काहीतरी private असत.त्यातली खुमारी फक्त आपली असते.
अशा सगळ्या सगळ्या क्षणांमध्ये साथ दिलेल्या अवचित तरळून गेलेल्या मनात घुमत राहिलेल्या या ओळी. कोणत्याही निमित्ताशिवाय कधीही माझ्या भेटीला येवून तो क्षण फक्त माझा करून जाणा-या.

असे असंख्य क्षण माझ्या नावावर करण्यासाठी मी तुमची खूप खूप ऋणी आहे.

सर्वपित्री

दिवस: सर्वपित्री अमावास्या ( माझी आजी अमोशा म्हणायची. अमावस्येच लाडाच बोबड नाव वाटायचं.)
स्थळ: गच्ची
वेळ: दुपारचे बारा साडे बारा
वेगवेगळ्या प्रकारची पान वेगवेगळ्या ठिकाणी अंतर अंतरावर मांडून ठेवलेली.

ताट क्रमांक १: साग्रसंगीत , मीठ, लोणच, दही, कोशिंबीर, खीर, घारगे, भोपळा, गवार, कारली, इत्यादी सगळ्या माणसाने हयातीत नखाल्लेल्या भाज्या, वरण भात, पापड, पाणी….
कावळा क्रमांक १: ह्या एकाच कावळ्यात अनेक पिढ्या मधली अनेक पितर (थेट खापर खापर खापर पणजोबा किंवा त्याहून मागची ) सामावलेली असण्याची शक्यता आहे…
त्यामुळे कधी कधी एकाच कावळ्याच्या दोन विचारांमध्ये कमालीची तफावत आढळ्यास गांगरून जाऊ नये. split personality चा हा सर्वात पुरातन प्रकार असू शकेल का?

” वा आज सून बाईनी बरीच मेहनत केलीये हो, पोर घर कस छान सांभाळते, नोकरी करून तेही,”
“माझ्या हयातीत नाही कधी भरलं पान वाढलं मला ते आता खाऊ? मनात आणल तर अजूनही त्रास देवू शकतो मी. नाही शिवत जा…”
“माहित आहे हिला मला गवार नाही आवडत ते, तेव्हा सुद्धा असंच करायची मुद्दाम. शेवटी दिसायला नेहमी सासुच वाईट.”
“तरी एक बर आहे, हल्लीच्या पोरी कुठे करतात एवढ? ते शेजारच ताट पहा..मग तुला किंमत कळेल तुझ्या सुनेची”

ताट क्रमांक २: वरण भात (मूद नाही, असा तसाच), खीर, भाजी.
कावळा क्रमांक २: “उरकलं दर वर्षी प्रमाणे. अरे जरा काही मायेने कराल की नाही? त्या पेक्षा नसतं वाढलत तरी चाललं असतं, ”
” जाऊ दे ग, बरीच पान आहेत इथे, उपाशी नसतोच राहिलो. नाहीतरी आपण त्यांचे नक्की कोण, कोण येवून जेवल हे त्यांना कुठे कळणारआहे, ह्या ह्या ह्या…”

ताट क्रमांक ३: वरण भात, इत्यादी इत्यादी + ग्लुकोज बिस्किट्स आणि फरसाण
कावळा क्रमांक ३: “आहा…ह्याला म्हणतात प्रेम…थोडासा चहा सुद्धा चालला असता. ”
“कसलं प्रेम ते? त्या चहा बिस्किटांनी शुगर वाढली तुमची आणि आटोपलात.”
“आता तरी सोड ग ते नाव ठेवण… उपचार म्हणून करणा-या लोकांपेक्षा हा ओलावा हवा असतो ग, या वयात सुद्धा. ते बघ तुझ्यासाठी घारगे पणठेवलेत, कोलेस्ट्रोल ला बरे तुझ्या. ह्या ह्या ह्या”
“जळली तुमची ती थट्टा..काव काव…शिवा लवकर, त्यांना ऑफिस ला उशीर होत असेल. ”

गच्चीवरच्या ताटांचे नमुने बघून सुचलेलं हे काहीबाही. एक प्रतिक म्हणून मला हि प्रथा खूप आवडते. त्यात सत्य किती तथ्य किती ते माहितनाही. अशा ब-याच गोष्टी केवळ संस्कारांनी स्वीकारायला शिकवल्या हे मात्र खर. काढायला गेलो तर किती तरी प्रश्न, शंका निघतील. पणया दिवसाच्या निमित्ताने आपल्या पूर्वजांच निदान आपल्या आजी आजोबा, आई बाबांच्या प्रेमच, त्यागाच एक स्मरण करू शकतोच. अर्थात त्या साठी एका विशेष दिवसाची गरज नाही.
न पाहिलेले पूर्वज माहित नाही पण कधी काळी ज्यांच्याबरोबर दिवाणखान्यात बसून गप्पा मारत, TV बघत एकत्र जेवलो होतो, भाजी आमटीला नाव ठेवत तर कधी एकमेकांची मस्करी करत, त्या आपल्या स्मरणातल्या सगळ्या प्रेमळ आठवणींसाठी माझ एक पान. फरसाणबिस्कीट आणि घोटभर चहासकट.

मी मनात काही ठेवत नाही

अमुक अमुक माणसाने तमुक तमुक प्रसंगी इतका त्रास दिला…काय काय बोलले असतील म्हणून सांगू? तोडायला वेळ नाही लागत, जोडायला जन्म लागतो. डोळ्यातन पाणी काढाल अक्षरशः. तरी
मी मनात काही ठेवत नाही……
मी मनात काही ठेवत नाही म्हणताना त्या ‘काही’ मध्ये किती काय काय साठवलेलं घुसळून वर आलेलं असत. याची पुसटशी सुद्धा जाणीव बोलणार्या माणसाला जराही नसते. बर्याचदा ऐकणारा सुद्धा डोळ्यातल्या पाण्यात वाहून गेलेला असतो. कदाचित तो हेच वाक्य हक्काने वापरण्याची बेगमी करत असतो. “त्यावेळी मी त्याला इतक समजून घेतलं आणि आज बघा..मी मनात काही ठेवत नाही पण…”
“अमुक तमुक बोलतो पण त्याच्या मनात काही नसत.” मग कुठून बोलतात?
खरच असतो का आपण इतके शुद्ध संत? गाळलेल पाणी वेगळ आणि निवळलेल वेगळ. बहुतेकदा नितळ पाण्याचा फक्त भासच असतो. जरा ढवळल की सगळा गाळ हा असा वर येतो आणि ज्या नितळ पणाला सिद्ध करायचं असत तेच गढूळ होऊन जात.

स्वतःशीच विसंगत असणारी अशी कितीतरी वाक्य रोज ऐकण्यात येतात. कधी कधी ती ऐकताना गम्मत वाटते आणि कधी कधी राग येतो. हे त्या त्या वेळी त्या त्या गोष्टीशी आपण किती जोडलेले आहोत तसं तसं बदलत जात. पण ह्या वाक्यांवर बोलण्याच्या भरात कधीच विचार केला जात नाही.

असंच अजून एक वाक्य म्हणजे ” माझी काही अपेक्षा नाही…पण…”. हा ‘पण’ अत्यंत घोळ घालणारा प्रकार आहे. ‘अपेक्षा’ कुठली हे सापेक्ष आहे. पण हा ‘पण’ त्या सगळ्या अपेक्षा अधोरेखित करतो हे अपेक्षित नसतच बहुतेकदा.

“दोष माझ्यातही आहेत..मी नाही म्हणत नाही..पण…” पुन्हा ‘पण’. पण काय?
१. माझ्यातले दोष मी शुद्धी करून घेतल्यामुळे गुणात बदलले आहेत?
२. माझे दोष क्षम्य आहेत कारण ते ‘माझे’ दोष आहेत?
३. माझं वकील पत्र साक्षात श्रीहरी ने घेतलाय?
४. माझ ते कुसळ आणि तुझ तेव्हढ मुसळ?
नक्की काय म्हणायचं असत? फक्त मान्य केल्याने नाहीसे होतात का दोष?

ह्या सगळ्यातून मला जाणवत ते एकच. आपण कधीच स्वतःला आहोत तसे स्वीकारायला तयार नसतो.
पण त्यातही एक समाधान मात्र आहेच कि वर्षानुवर्ष आपल्याला शिकवलेली असतात ‘आदर्श’ माणसाची लक्षण. मनोमन आपल्यालाही ठावूक असत आणि लोकांनाही की आपण तसे नाहीच. पण तरी तसे असण्याची / किंवा किमान लोकांना तसे भासण्याची सुप्त महत्वाकांक्षा असेल कुठेतरी मनात म्हणून…पण आपण माणूस असण्याच्या जवळ जात असतो नक्की.

Value add, Big Picture and the list goes on.

Value add
Big picture
Solution Providers
Unique selling Proposition
Strategic view
Competitive benchmark…and the list goes on.

तुम्हाला कंटाळा नाही येत असल्या बडबडीचा?
ह्या शब्दांचा?
मला तर अक्षरशः आजकाल वीट येतो. आई शपथ . बोलणाऱ्याच्या डोक्यात वीट घालावी इतका वीट येतो.
काय त्या बोलण्यातला आव, अहाहा. आणि त्याच वेळी आपण करत असलेली थुकपट्टी. आहाहाहाहा. ती लपवायला वरून छान छान packaging. वाह वाह क्या बात क्या बात.
सुरवातीला हे असले शब्द आपल्या manager कडून ऐकताना कोण अप्रूप वाटायचं काय सांगू! आपण चक्क मोठे झालोय अस काहीतरी. ते शब्द वापरताना तर मनातल्या बेडकीचा बैल व्हायचा फुगून. कॉलेज मधले टवाळ पाचकळ विनोदांच्या कोट्यांचा डोंगर रचणारे ते आपणच कि आणखी कोण?
आणि हे काही कळण्या सवरण्याच्या आतच लक्षात आलं कि आपण त्या ‘corporate world ‘ चा एक भाग होऊन जुने झालोत.
हळू हळू टेबलाच्या ह्या बाजूकडून त्या बाजूकडचा प्रवास सुरु झाल्यावर बर्याच गोष्टीतला भंपकपणा जवळून पाहायला मिळाला.
च्यायला, (sorry . s o r i सॉरी ) ह्या client ला सांगायचं अमुक ढमुक कर म्हणजे तुझ्या अ ब क competitors ची चांगली जळेल. आणि त्याचवेळी अ ब क कडे पुढच्या प्रोजेक्ट साठी खडे टाकून ठेवायचे. हे असले धंदे सरळ सरळ सुख सुखी जमले नसते बुवा आपल्याला बापजन्मी. पण ज्याच्या कडून पगार घेतोय त्याचं आणि पर्यायाने आपल्या सगळ्याचं पोट ह्याच धंद्यावर ह्याला काय म्हणायचं! (नोकरी ह्या एका सरळ सोप्या शब्दात आत आत किती खाचा खोचा..कारकुनाच सुद्धा नोकरीच आणि CEO ची सुद्धा नोकरी च. हॉटेलात पो-या म्हणून लागला तरी नोकरीच आणि VP marketing सुद्धा नोकरच. जाऊ दे विषयांतर झाल)
नाही म्हणायला collectively कुठे तरी काहीतरी चांगलं घडतंय असं म्हणायला थोडा वाव आहे म्हणून ह्या थोडयाशा हलकटपणाच ओझ सहन करता येईलही. पण अंदर कुच कुच धुमसता हैहीच न?

शब्द मुके फोल फोल म्हणून सोडून देता येतीलही.
त्यांच्या मागची जाणीव मात्र दुकःरी खुपरी होत जाईल.
त्याचं सांगा कराल काय?

व्यवहार म्हून सोडून द्याल विवेकाची देव घेव
इमान नावाचा भुंगा मात्र पोखरत राहील आतून जीव
त्याचं सांगा कराल काय?….

चहा- डी

प्यायची वेळ झाली की सारखे घड्याळाकडे लक्ष जाणे, घशाला कोरड पडणे, मन एकाग्र न होणे, एकदाची धार पेल्यात पडली कि हायसे वाटणे आणि घशाखाली पहिला घोट उतरला कि जीव शांत होणे.
हे बरेच दिवस होतंय माझ्या बाबतीत.
नाही मी बेवडी नाही आहे. पण मी चहा-डी आहे. आणि हे post मी माझ्या चहा-ड्या (चहा-द्या अस वाचलात तर चूक तुमची नाही) सांगणार आहे.

तर झाल अस…
“साखर म्हणजे पांढर विष” अस आमच्या फ्यामिली वैद्यांनी सहा वर्षापूर्वीच सांगितलं होत. नंतर सुद्धा बर्याच ठिकाणी वाचलं ऐकलं होत. पण जसं वाचलं तसं सोडून सुद्धा दिलं. पण परवाच्या lecture नंतर साखर actually सोडण्याचा निर्णय घेतलाच शेवटी. incentive ? माझी dangerously scary low calcium index. अंशतः का होईना साखर बंद केल्यावर improve होईल.
तशी मी गोड खात नाही फार. जी काही साखर जाते ती चहातून. पण चहा म्हणजे माझा अशक्त बिंदू (weak point). सकाळ संध्याकाळ दुपार आणि जमलाच तर अधे मध्ये मला चहा लागतो(च) .
पहिला दिवस तसा सोपा गेला. रविवार, सुट्टी, मनसोक्त झोप म्हणून असेल. पण तल्लफ नाही आली.
सोमवार उजाडला आणि परीक्षेला सुरवात झाली. सकाळी चहाची तहान दुधावर भागवली. पण नंतर भरपूर कार्बन खाऊन पिऊन जेव्हा office ला पोचले आणि समोरच हसतमुखाने आल्याच्या वासाने दरवळणारा चहा सर्व करणारा रामलाल दिसला…
“प्रत्येक साखरेचा चमचा तुमच्यात acid निर्माण करतो आणि तिला neutralize करण्यासाठी तुमच्या हाडातून calcium घेतलं जात. हे काम तुमचा body police trillianth of seconds मध्ये करत असतो.”
कानात घुमल आणि माझ्या लढाई ला सुरवात झाली.
बिन साखरेच्या चहाचे नखरे इथे पुरवणार नव्हत कोणी. आणि साखर बंद म्हणून चहा बंद हे सुधरत नव्हत.
“चहा मधलं tanin तुमच्या आहारातल्या फेरस च फेरीक मध्ये रुपांतर करत जे शरीर वापरू शकत नाही.” पुन्हा आकाशवाणी.
पण माझ्या शरीरात सध्या सापडलेला कार्बन डाय ओक्साईड tannin carbonate मध्ये रुपांतरीत व्हायला आसुसलेला होता.

योगायोग असा कि सध्या हातात ‘मुक्तांगण ची गोष्ट’ आहे. चहा बघून माझी अवस्था फार वेगळी आहे त्या दारूड्यांपेक्षा अस अजिबात वाटत नाही. आणि यात अतिशयोक्ती बिलकुल नाही. चहाचे परिणाम दारू किंवा गर्द इतके भीषण नाहीत यात मी नवीन काय सांगायचं. पण मनाची घालमेल? तीच मोजमाप काय कराल? मी माझ्या डेस्क वर बसण काही वेळ (म्हणजे रामलाल अदृश्य होई पर्यंत) अक्षरशः टाळल. तो मला डेस्क वर बघेल मग चहा घेऊन येईल, मग कपाची किणकिण, आल्याचा वास, ती वाफ, तो चहा ओतल्याचा मंजुळ आवाज,….आह! ह्या सगळ्यावर मात करायची म्हणून मी थेट मुक्तांगण टेक्निक अमलात आणल. ‘त्या’ वेळेला ‘त्या ठिकाणी राहायचंच नाही. दूर जायचं, वेगळ्या विषयांवर, वेगळ्या माणसांमध्ये, राहायचं. ‘ती’ वेळ मारून नेण महत्वाच. माझी घालमेल, दूर जाणं
, फोन वर गुंतवून ठेवण स्वतःला सगळ ditto दारू सोडणाऱ्या माणसांसारख होत.
withdrawal symptoms? डोक दुखतंय सकाळपासून. याचमुळे का ते माहित नाही. सकाळ यशस्वी पणे निभावून नेलीये. आता दुपारचे ३ वाजलेत. पेंग अनावर झालीये, रामलाल ची वेळ जवळ येतेय. I am dreading the moment again.
मी साखर सोडतेय कि चहा ते कळत नाहीये. आणि व्यसन सुद्धा नक्की चहाचं आहे कि साखरेच तेही.
आजवर व्यसनाधीन माणसाला बघितलं कि ‘हे लोक अस कस करू शकतात’ अस नेहमी आपसूक विचारलं जायचं. आता कळतंय.
आणि मी सुद्धा मुक्तांगणचीच slogan follow करतेय.

“one day at a time’. 🙂

बोन्साय

“हेलो”
“हेलो. मी बोलतोय”
“बोल”
“यायला उशीर होईल”
“नेहमीचच..त्यासाठी फोन कशाला?”
“हेही नेहमीचच”
“काय”
“हेच..कुचकट बोलण”
“निदान आजतरी वेळेवर यायला हवं होतस, आजचा दिवस विसरलास? आज…”
“माहित आहे. गौ चा वाढदिवस आहे. तिला फोन करेन नंतर. गणेश बरोबर तीच गिफ्ट सुद्धा पाठवतोय..party च्या वेळेपर्यंत येईल तो घेऊन”
“तिला गिफ्ट नकोय, तू हवा आहेस.”
“आज महत्वाची मीटिंग आहे client बरोबर. ”
“असं कधीतरी तुझ्या client ना पण सांग ना..माझ्यासाठी नाही निदान गौ साठी.”
“अडाण्यासारखी बोलू नकोस. ”
“अश्विन…”
“जावू दे मला वाद घालयाची इच्छा नाहीये..फक्त कळवायला फोन केला. गौ ला कसं समजावायचं ते मी बघेन..”
“आणि मी तिचा हिरमुसलेला चेहरा…”
“U r impossible”
“and u?”
______________

“कधी आलास?”

“झाला अर्धा तास. झोपला होतात दोघी म्हणून उठवलं नाही. ”
“ड्रिंक्स घेतोयस?..आत्ता? दोन वाजलेत रात्रीचे.”
“मग काय चहा च्या वेळी घेवू? तू झोप.”
“पार्टी मध्ये घेतलीच असशील..आत घरी येवून continue ? This is not good ashwin.”
“झाल lecture सुरु? तुला काय त्रास होतोय? झोप ना आत जावून तू. ”
“हे गौ साठी ठीक नाहीये.”
“गौ च्या समोर घेतोय का मी?
“सकाळी बाटल्या बघेल ती.”
“विल्हेवाट लावून झोपेन”
“तेव्हढी शुद्ध असणार आहे तुला?”
“Why dont you bloody trust me?”
“आवाज खाली कर..गौ उठेल”
“गौ गौ गौ…मी कोणीच नाही का? तुझा? तिचा?”
“हा प्रश्न मला नाही स्वतः ला विचार. good night ”

______________
“हाय”
“हाय”
“इतका थंड प्रतिसाद? अग जवळ जवळ दहा वर्षांनी भेटते आहेस. काही लाज. काय झालंय?”
“कुठे काय? सहजच वाटल भेटावस.”
“अशक्य. मागच्या पंचवीस वर्षांच्या मैत्रीत मी एव्हढी नक्कीच ओळखते तुला. मागच्या दहा वर्षात न भेटण्याची असंख्य कारण दोघींकडेही असताना आणि तरीही मैत्री आटणार नाही हि खात्री असताना तू फोन करून “भेटायचं,,आज, आत्ता” हे सांगण काहीही झालेलं असल्याशिवाय? शक्य नाही. बोल काय झालंय? ताकाला जाऊन भांड लपवण्याची तुझी सवय माहितेय मला. त्यामुळे बोल. please.”
“अग खरच काही नाही.”
“ओके. ठेवला विश्वास. आधी थंड गार पाणी पाज, गौ कुठाय? मोठी झाली असेल न ग आता?”
“छोटी असताना कुठे पाहीलयस तिला? खेळायला गेलीये खाली.”
“हा फोटो काय गोड आहे ग. भाग्यवान आहेस. छान सजवलयस घर.
बोन्साय? कसलं आहे? ओह संत्र्याच? cute आहे ग. झाडांची आवड तुला कि अश्विन ला?” ”
“आईना होती. आता माळ्याला आहे.”
” वा. अजून विनोद बुद्धी शाबूत आहे”
“thanks. बोन्साय अश्विन ने आणलंय. पण, मला नाही आवडत ते खुंटवून टाकण, आपल्या मजेसाठी””
“अरे हो. अश्विन कसा आहे?”
“मजेत.”
“आणि तू?”
“मजेत ग. का पुन्हा पुन्हा विचारतेयस. म्हटलं न सहज भेटवस वाटल. तेव्ह्ढाही हक्क नाही का माझा? काय ऐकायचय तुला माझ्याकडून नक्की?”
“अनु..अनु relax …बस खाली आधी.. पाणी घे. नाही विचारणार परत. सॉरी. तुला disturb नव्हत करायचं. ”
.
.
“सॉरी अज्जू. ओरडायला नको होत मी अस तुझ्यावर. पण त्या बोन्साय सारखा झालाय ग संसार..खुरटलेल्या नात्यांचा. येणाऱ्या जाणार्या प्रत्येकाने पाहून कौतुक कराव आणि मुळांनी त्या सुंदर cute दिसण्याची किंमत मोजत राहावं..अज्जू, ते बोन्साय म्हणजे आमच लग्न आहे ग..”
“अनु…”
_________________

“हाय”
“घरी? या वेळी?
“हम्म. गौ आहे घरात?
“नाही. क्लास ला गेलीये. anyways, तुला तिचं time-table माहिती असण्याची अपेक्षाच नाही..”
“अनु प्लीज. बर आहे ती नाहीये ते. बोलायचय जरा.”
“कॉफी करू?”
“नको”

“पुढच्या महिन्यात निघावं लागेल.”
“परत विचार कर..गौ ला तिच्या या वयात बाबांची गरज आहे.”
“अशी संधी पुन्हा मिळणार नाही. आणि जे कमावेन ते तुमच्याचसाठी.”
“पुन्हा तेच. कमावेन कमावेन… पण आम्हाला काय हवंय ते कधी विचारायची गरज वाटली? ”
“नाही. त्याची गरज नव्हती. आज गौ top च्या IB school मध्ये जावू शकते कारण मी कमावतो तेव्हढे. ती उद्या शिकायला बाहेर जाईल तेव्हा अभिमानाने मिरवशील. तेव्हा नाही खटकणार तुला हि कमाई…”
“गरज नव्हती? कधीच? गौ दिवसेन दिवस अबोल होत चाललीये, जास्तीत जास्त वेळ घराबाहेर घालवते, रात्री अपरात्री घरी येते, तुला या सगळ्याची जाणीव आहे?”
“ते तुझ काम आहे. तुम्हाला आजवर काहीही कमी पडून दिलेलं नाहीये मी. तरी तुला जर एव्हढी साधी गोष्ट सांभाळता येत नसेल तर तो दोष तुझा आहे, त्याच खापर माझ्यावर फोडू नकोस. and by the way, हे दिवस आहेत तिचे मजा करण्याचे. करू दे, काय प्रोब्लेम आहे?”
“कधी निघणार आहेस?”
“पुढच्या महिन्यात, तारीख नक्की झाली कि सांगतो.”
“गौ ला कधी सांगणार आहेस?”
“तिला काय सांगायचं वेगळ? तू सांग.”
______________

“फोन कोणाचा होता पपा?”
“कॅरोलीन. collegue आहे”
“फक्त collegue?”
” That’s none of your business. तू इथे शिकायला आलीयेस. तेच कर.”
” आईला कल्पना आहे?”
“नाही. अजून तरी.”
” आईचा विचार केलायत पपा? पपा you are cheating her. का करताय हे तुम्ही? मी इकडे आले नसते तर मलाही हे समजलं नसतं. ती तिकडे एकटी…”
“ओह stop it . You are just sounding like that ***”
“papa mind your language. तुम्ही माझ्या आईबद्दल बोलताय. ”
“मला चांगल माहितेय, तू शिकवण्याची गरज नाहीये. तू जे करायला आलीयेस ते कर, नको ते विचार करण्याची तुला गरज नाही…”
“कोणाला कशाची गरज आहे हे सगळ तुम्हीच ठरवणार आहात का कायम? तुम्हाला फक्त तुमची गरज कळते. ”
“हो कळते मला फक्त माझी गरज, कारण ती तुझ्या आईला कधीच कळली नाही.. तुझ्या जन्मानंतर ती फक्त तुझी आई झाली. गौ साठी गौ साठी सगळ फक्त गौ साठी. मला माझी बायको हवी होती पण ती फक्त आई झाली. It was not my fault. तरी मी तेव्हाच तिला सांगितलं होत की…”
“काय? काय सांगितलं होतंत पपा?”
“…”
“मला जायचय, उशीर होतोय. ”
“माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या पपा. काय सांगितलं होतंत? कि मी तुम्हाला नकोय म्हणून?”
“…”
“answer me”
“गौ I have to go. bye. आणि कॅरोलीन चा विषय तुझ्यापुरताच ठेवलास तर बर होईल. anyways , इथे लग्नाची commitment नाहीये. त्या मुले तुझ्या आईला divorce द्यायचा प्रश्न नाहीये. आणि तू या सगळ्यात पडू नकोस हेच बर. ही गोष्ट माझ्या आणि तुझ्या आई मधली आहे.”
“खर आहे. ही गोष्ट तुमच्या आणि तिच्यातली आहे. आणि मी? नक्कीच तुमच्या आणि तिच्यातली नाहीये. bye पपा.”
.
.
.

____________
“हलो”
“हलो, गौरी प्रधान इथेच राहतात का?”
“हो, आपण कोण?”
“मी इन्स्पेक्टर सावंत बोलतोय, पनवेल पोलीस स्टेशन, आपण?”
“मी तिची आई बोलतेय, काय झालंय? गौरी ठीक आहे न?”
“तुमच्या सारख्या पालकांना काही झालं की मगच जाग येते. पोरांच्या हातात पैसा दिला की संपल काम तुमच. आता बाई माणूस आहात; जास्त काय बोलणार. तुम्हाला लगेच इकडे याव लागेल,”
“पण काय झालय सांगाल का प्लीज? ”
“पनवेलच्या फार्म हाउस वर rave party चालू होती, तिथे पडली होती तुमची पोर. injection घेऊन. डोस जास्त होता. serious आहे. लगेच निघा बाई तुम्ही.”

_______

“अश्विन”
“बोल, एव्हढ्या रात्री फोन?”

“गौ गेली. ”

“कुठे? काय बोलते आहेस?”

“गेली. कायमची. ”

“कळवायला फोन केला. तू इथे येईपर्यंत मीही नसेन. माझ्या गौने मला मोकळ केल. मी तुला मोकळ करतेय.”

“काय बोलतेयस तू अनु? are you out of your mind? कोण आहे तुझ्या बरोबर? गणेश कुठे आहे? मी श्रीकांत ला पाठवतो घरी, तू थांब…काहीतरी टोकाचे विचार करू नकोस.”

“खूप उशीर झालाय रे अश..अश्विन…”

“अनु, माझ्याशी बोलत राहा मी श्री ला फोने लावलाय. wait . ”

“अनु..”

“…”

“…”

“अनु मी येईपर्यंत थांब अनु..

“त्याची गरज नाही आता अश्विन. एकच गोष्ट शेवटची ऐकशील? तुझ्या ..तुझ्या आणि करो करोलीन च न? तुमच्या घरात बोन्साय ठे ठेवू नका..”

“अनु”

“अनु?”

“…”

“…”
__________

मा exchange

“मा exchange”
सोनी TV वरचा हा नवीन रिअलिटी शो.
“talent shows” मी समजू शकते.
‘स्पर्धा’ हा concept अनादी काळापासून अस्तित्वात आहे. अगदी देवा दानवांपासून. महाभारतात पहिल्यांदा कौरव पांडवांनी आखाड्यात उतरून स्वतः ची कौशल्य दाखवली तो talent show च होता. आणि रामायणात शिव धनुष्य पेलण्याची स्पर्धाच होती.

गाणं, नाच, पाककला, धाडस अशा अनेक कौशल्यांना हाताशी धरून अगणित ‘Reality cum Talent cum drama shows’ चालू आहेत. काही यशस्वी, काही अयशस्वी. प्रत्येक show ला business angle आहेच. किंवा म्हणूनच तो शो अस्तित्वात आहे. नाहीतर समाजसेवे साठी आजच्या जमान्यात अशा गोष्टी कोणीच करत नसतं. त्यामुळे प्रेक्षकांच्या भावनांना आवाहन करून sms वगैरे करायला लावण हेही आता नेहमीचं झालंय. त्यातूनही जो प्रेक्षक शहाणा झाला तो झाला, नाही तो अजुनही स्वतःच्या खिशाला भोक पडून sms करतो. कधी कधी स्पर्धकाचे पालक sms manipulate करतात हा सुद्धा भूतकाळ.
पण निदान, किमान पक्षी तिथे कोणाच्या तरी गुणांना व्यासपीठ मिळत होत. किंवा मिळतंय. कधी कधी अत्यंत गरजू गरीब गुणी मुला मुलींना या शो ने आधार दिलाय हे मान्य कराव लागेल.
पण पूजा बेदी ला का बाबा हवाय आधार? मानसिक, कि आर्थिक? तिने का बुवा दुसर्याच्या घरी कामवाली म्हणून जावं? ती काय किंवा इतर कोणीही lokhandwala किंवा पाली हिल किंवा तत्सम ठिकाणी १० नोकर हाताशी असलेल्या जमातीतल्या कोणीही…काय गरज?

भावनिक आवाहन करणं, प्रेक्षकांचा कौल मागण आणि भावनांशी खेळण यात खूप मोठा फरक आहे.
business करणं आणि विवेक सोडून प्रत्येक गोष्टीचा बाजार मांडण यात फरक आहे.
निदान माझ्या सारख्या आणि तुमच्या पैकी कित्येकांसारख्या पापभिरू कुटुंबात वाढलेल्या माणसांच्या लेखी तरी तो फरक अजूनही जिवंत आहे.

स्वयंवराच्या निमित्ताने ‘लग्न’, ‘प्रेम’, वगैरे आणेल हळुवार भावनांचा व्यापार मांडून झाला. त्यात स्वतःच्या भावना विकायला participants तयार झालेच आणि चवीने पाहणारे निर्लज्ज प्रेक्षकही त्या विकत घ्यायला तयार झाले!
‘पती पत्नी और वो’ च्या निमित्ताने या व्यापाराने एक पाउल पुढे टाकलं. पालक आपली मुलं विकायला निघाले. celebrities वात्सल्य विकायला निघाले.
आणि आता ‘मा exchange’. आई कशी बदलू शकते? आणि का बदलावी? पैसे कमावण्याच्या आणि सतसत विवेक बुद्धी गमावण्याच्या या घाणेरड्या खेळात सह कुटुंब सहभागी होण्याला कोणाचाही कसा विरोध नसू शकतो? पैशाचा माज, आणि हाव अजून किती विकृत होत जाणार आहे?
ज्यांना खरोखर आई बदलावी लागते किंवा मिळतच नाही त्यांना विचारा…समाजाचे कितीक हळवे जखमी कोपरे जगण्याची लढाई लढत असताना आपल्या media ला हा खेळ खेळावासा वाटतो, त्यात सफेदपोश, राजकारणावर आणि तत्सम गोष्टींवर हक्काने टीका करणाऱ्या समाजाच्या मोठ्या घटकाला सहभागी व्हावस वाटत ह्यापेक्षा दुसरी शोकांतिका कुठली?
कुठलाच धरबंध नसणारे हे reality show अजून किती काळ चालणार? मायबाप प्रेक्षक अजून किती काळ चालून देणार?
एकीकडे
‘प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई…ह्या बाळकडू वर मोठी झालेली मी,
डोळ्यात प्राण आणून संध्याकाळी माझी वाट पाहणारी माझी छकुली,
“दूर देशी गेला बाबा” ऐकून ओक्साबोक्शी रडणारी सुद्धा माझीच पिढी.

आणि मेलेल्या भावनेने ‘मा’ exchange सारखे शो रंगवणारे आणि येवू घातलेल्या पिढीची विचार करण्याची शक्ती लयाला नेवू पाहणारे समाज द्रोही !

आई exchange करत मृत होत जायचं की सुख दुखः वाटून घेत समृद्ध होत जायचं..निवड आपली असायला हवी. आपल्यासाठी नाही…आपल्या पिल्लांसाठी. आपली दोन घटका ‘करमणूक’ हि त्यांच्या बुद्धीची, संस्कारांची आणि भावनांची ‘मरवणूक’ होऊ नये म्हणून.