Archive for the ‘ kavita ’ Category

झालं होत फक्त एवढंच

आज यातलं काहीच दिसलं नाही
रस्ते, खड्डे
धूर, धूळ,
घाण, चिखल
बातम्या, पोस्टर्स

आज यातलं काहीच खुपलं नाही
गजर, बडबड
कलकल, आवाज
ह्याची चरबी
त्याचा माज

आज यातलं काही झालंच नाही
चिडचिड वैताग
धांदल, गडबड
त्रागा, तगमग
तडफड, कडकड
.
.
.
झालं होत फक्त एवढंच,
कालचा दिवस संपताना
तू माझ्या आणि मी तुझ्या मनावर अलगद हात ठेवला होता.

कदाचित

कुणाचच कुणाशिवाय अडत नाही तसं
तुझ माझंही अडणार नाही कदाचित

येतील जातील श्वास नेहमीच्या सवयीने
तुफानाची ओढ मात्र त्यांची सरेल कदाचित

बरगड्यांच्या आतलं यंत्र उघडेल झडपा नेमाने
धडधडण्याची खोड मात्र त्याची जिरेल कदाचित

नियमानुसार शास्त्राच्या तहान भूक सुद्धा लागेल
तुझ्यासाठी ताटामधला घास उरेल कदाचित

ओली होईल पावसाने आणि थंडीत कात थरथरेल
मोहरण्याची जाणीव मात्र तिची विरेल कदाचित

तारीख बदलेल दिवसागणिक सगळ सगळ तसंच होईल
रिकाम्या, सुन्न मनात ओळख माझी झुरेल कदाचित

कुणाचच कुणाशिवाय अडत नाही तसं
तुझ माझंही अडणार नाही कदाचित  

होत का अस कधी कधी?

होत का अस कधी कधी?
तावातावाने मिटिंग मध्ये
मुद्दे बोजड मांडताना
रुणझुण रुणझुण वाजत राहतो कानामध्ये पावूस निळा?

होत का अस कधी कधी?
नितळ काचेच्या बंद खोलीत
गुप्त खलबते करताना
गर्द राईतून फांदीआडून चिडवत राहतो पक्षी खुळा ?

होत का अस कधी कधी?
कुजबुजणा-या सभ्य गृहात
वाक्जड पेले रिचवताना
अवचित अलगद मनात स्मरता तिने दिलेल्या शुभ्र कळ्या ?

होत का अस कधी कधी?…

निःशब्द

तुझे म्हणावे तुझेच केवळ

असे काही एक माझे निव्वळ

 

कुणी म्हणाले तिथेच बनती

जुळती तुटती रेशीमगाठी

मी न पाहिले हात तयाचे

तुझ्या किनारी सापडले घर

 

आयुष्याच्या अंक पटावर

दिले घेतले हिशेब झाले

समर्पणाच्या वाटेवरचे 

आज पडावे पहिले पाउल

 

उलगडताना ह्रदयाची  धून

सूर कापरा कातर कातर

शब्दांची वीण उसवीत जाती 

शब्दांवाचून डोळ्यांचे तळ

 

 तुझे म्हणावे तुझेच केवळ

असे काही एक माझे निव्वळ

तुला जमावे मला जमावे

तुला जमावे मला जमावे
त्रास जीवाचे सोडून देणे
डोळ्यामधल्या पाण्यालाही
जमून जावे वाहून जाणे

दोन मनांच्या मधले अंतर
आहे केवळ टोचत राहणे
कसे कळावे खुळ्या मनाला
निवडुंगाचे बहरून येणे

भास जगाचे खासच फसवे
त्यात जडावे दुर्धर रुसवे..
ओठांवरचे शब्द गरिबडे
श्वासागणती खडतर होणे

आठवणींचे गुलाब हळवे
नको उशाशी काटे जपणे
निर्माल्याचे प्राक्तन घेउनी
जन्मा यावे आपले जगणे

गुपित

हे चिमुरड रोप दिवसभर आकाशाकडे तोंड करून काहीतरी बोलत राहतं
ती भली मोठी निळी छत्री त्याच्याच मालकीची जणू
ते सुद्धा खुशाल गोंजारतं त्याची सगळी गुपितं,
हळूच दडवतं आपल्या पांढ-या शुभ्र दाढीत.
आणि रात्री आपल्या प्रेमळ हातांनी झोके देत निजवतं त्याला अलगद.
सकाळी उठून हे वेड पोर त्या छत्रीकडे बघून तोंडभर हसतं
कोणास ठाऊक काय चालत दोघांच आपल्या आपल्यात…

पण रोज सकाळी मला दिसते माझी बाग फुललेली!

चेहरे

चेहरेच चेहरे अवती भवती
नाक डोळे ओठ सारे काही
प्रत्येक चेह-यावर जागच्या जागी
सुरकुत्यांच्या नक्षी सहित,
सगळ अगदी माणसांसारख
हसरे, सुंदर, रंगीत काही
काही नेटके, मोजके, माफक
पण गुच्छ असे नाहीतच ताज्या टवटवीत फुलांचे कुठे
आपापल्या ओळखीसकट एकत्र बांधलेले, जग सुंदर करणारे..
सगळे विखुरलेले, माळेतून ओघळलेल्या मोत्यांसारखे
मोती खरेच, पाणीदार…पण आपापले अदृश्य शिंपले घेऊन फिरणारे

आणि वातावरणात भरून राहिलेले स्वर
डोळ्यातलं मृगजळ लपवता लपवता ओठातून निसटलेले…

कायद्याने ते समान…

तो ‘तो’, ती ‘ती’
पण कायद्याला काय त्याच?
कायद्याने ते समान.

ती पहाटे गजर लावून उठते.
तो सकाळी ओव्या ऐकून
गजर ‘तो’, ओवी ‘ती’
हिशोब तसा बरोबरच
कायद्याने ते समान.

तिची धावपळ, त्याचा आरडओरडा
तिची आवराआवर, त्याचा पसारा
ती करते त्रागा, तो घालतो समजूत
त्रागा ‘तो’ समजूत ‘ती’
हिशोब पुन्हा बरोबर
कायद्याने ते समान

तिची नोकरी, त्याचा जॉब
तिची अब्रू त्याचा आब
संसाराचा गाडा ‘तो’ हाकतो
संसाराचा गाडा ‘ती’ ओढते
पण कायद्याला काय त्याच?
कायद्याने ते समान

तिच्या पोटी त्याचा अंश
ती वाढवते त्याचा वंश
वंशाचा दिवा देवाच्या ताटी
धनाची पेटी व्यवहारासाठी
दिवा ‘तो’ पेटी ‘ती’
पण कायद्याला काय त्याच?
कायद्याने ते समान

न्याय देणारी देवता ‘ती’
निर्णय घ्यायला लावणारा कायदा मात्र ‘तो’
त्याच्या लेखी फरक फक्त एका रेषेचा
ताठ उभ्या मात्रेचा आणि वाकलेल्या वेलांटीचा
त्याच काय घेऊन बसलात एव्हढस?
कायद्याने ते समान…

सूर्यास्त

त्याच्या नजरेतला उग्र भारदस्त दरारा
जरासा सौम्य झाला काय आणि
सगळा नूरच पालटला.

रंगांच्या उत्सवात
तारकांच्या मांडवात
तो उभा होता क्षितिजावर
स्वतःच्या निवृत्तीचा सोहळा पाहात.

आश्वस्त

ह्या रेताड रखरखाटात
कोणास ठाऊक कशी चिकटून बसलीत ही पाती
आणि कोण सोस त्या वा-याला सुद्धा
ह्या जळजळाटात स्वतः तापत फुंकर घालण्याचा तरी
मृगजळाला सुद्धा भास व्हावा मोरपिसांच्या रंगांचा?

ह्या वेडेपणाच तू नाव आहेस कि कारण हे माहित नाही पण
तुझा हात इथे फिरलाय हे नक्की…