Archive for the ‘ Uncategorized ’ Category

जपून ठेवूया…

जपून ठेवूया पूल थोडे तुझ्या माझ्या नजरेचे
एकमेकांच्या मनात उतरायची वेळ कधी आलीच तर?

जपून ठेवूया उब थोडी आपापल्या हातातली
एकमेकांना पंखाखाली घ्यायची वेळ आलीच तर?

जपून ठेवूया वाट थोडी एकमेकांची बघण्याची
कारणाशिवाय जगण्याची वेळ कधी आलीच तर?

तेव्हा भेटूच.

‘तेव्हा भेटूच.’ Kavita published in MisalPav Diwali ank 2012:
http://www.misalpav.com/diwali2012/tevha_bhetuch
 
रसरशीत तापलेल्या सोनेरी झळीतल्या आणि
ओल्या निसरड्या फसव्या घळीतल्या

कात टाकणार्‍या रंगीत पानगळीतल्या आणि
गर्दीने नटलेल्या बाजारातल्या आळीतल्या

निरव चांदण्यात निपचित पहुडलेल्या आणि
काळ्याभोर रेषेत क्षितीजाला भिडलेल्या

सगळ्या सगळ्या वाटांवरून सोबत चालतानासुद्धा
वाट बघणं मात्र संपत नाही
मी तुझी, तू अजून कुणाची…

पण या सगळ्या वाटा मिळतात तिथे त्या मुक्कामाला
मला खात्री आहे,
मीच पोचेन तुझ्या आधी, आणि तुही येशीलच कधीतरी

तेव्हा भेटूच.

Herbarium

एक पुस्तक आहे
आपण दोघांनी मिळून लिहिलेलं
मोजकीच पान आहेत
आणि प्रत्येक पानावर मोजकीच अक्षर
विखुरलेली
शब्द होण्याची वाट बघत थांबलेली…
आणि एक पान सुद्धा जपलेल, जाळीदार

बरेच दिवस बुकशेल्फ मध्ये पडून आहे
त्याच कव्हर अजून तसच आहे, नितळ
सोनेरी अक्षर लुकलुकतात धुळीच्या पडद्यामागून

एरवी कोण हातात घेणार ते ,इतरांसाठी नव्हतच ते कधी
अर्थ तरी कसे लागायचे त्यांना अर्ध्या मुर्ध्या अक्षरांचे…
शब्द बांधायचे राहिले नसते आपले तर
एक तरी कविता फुललीच असती त्या पिंपळपानावर,
नाही?

२१-१२-२०१२

आज काही संपणारच असेल तर
संपू दे किल्मिष एकेका मनातलं

संपू दे वखवख, हव्यास, आणि अनावर भूक
संपू दे असूया, मत्सर, आणि वांझोटा अहंकार
संपू दे पाठलाग सोन्याच्या हरणाचा
ज्याची वाट जाते रावणाच्या असुरी महत्वाकांशेकडे
एक दिवस जळून संपण्यासाठी

संपू दे दरी तुझ्या-माझ्यातली आणि ‘त्याच्या’तली
आणि सापडू दे कस्तुरी आपापल्या आतली.

आज काही संपणारच असेल तर
संपू दे किल्मिष एकेका मनातलं

२१-१२-२०१२

फोटो

आजही केव्हढा जिवंत दिसतोय तुझा चेहरा!

तुझी sunshine smile ;
सकाळी माझ्या खिडकीतून फक्त माझ्यासाठी येणा-या कोवळ्या उन्हासारखी

आणि आपल्या मधल्या कॅमेराला बेदखल करत थेट माझ्या डोळ्यात आरपार बघणारे डोळे

आपण एकमेकाला बेदखल करण्या आधीच्या दिवसातला आहे ना हा फोटो?

उसवून…

उसवून वीण निखळून गेलेत किती क्षण
बिलगून राहिलेत काळजाला
जाणा-या काळाला पुढे पाठवून

आता वर्तमानाची ठिगळ लावून शिवावी लागते काळाची गोधडी रोज

अपूर्ण

ब-याच दिवसांनी भेटतो आपण
आणि बराच वेळ जातो शब्दाला शब्द जुळवण्यात
गुंतलेल्या दो-याची टोक शोधण्यात
निघायची वेळ होते कधी कळत नाही

मग परत एकदा हरवून जायचं
जगलेले आणि न जगलेले ते सगळे क्षण गोळा करण्यात
बोलायचे आणि सांगायचे ते सगळे शब्द गोळा करण्यात
तुझ्या डोळ्यात वाचलेलं आठवून आठवून मनावर गोंदून ठेवण्यात
पुढच्या भेटी साठी…

काही नाती फक्त अपूर्ण असण्यासाठीच असतात का रे?

हिरवळ

भणंग वा-याने वाहून नेल सुकलेल बरंच काही
वाळलेल्या काटक्या, सुरकुतलेली पान आणि काही नाती सुद्धा…
आपण मात्र होतो तिथेच थांबलो

चिकटून राहिले मनावर नात्यांचे भ्रम
दगडाला चिकटून बसलेल्या शेवाळ्यासारखे   
आणि मुठीत घट्ट धरून ठेवली होता चुरगळलेला सुका पाचोळा

आता वाटत तेव्हा अधीन व्ह्यायला हव होत
वाहून जायला हव होत
आणि बरंच काही वाहून द्यायलाही हव होत

नाहीतरी हिरवळ पायाखाली होतीच कधी?
ती तर जपली होती आत आत, स्वप्नांच्या डोहात
ती तेव्हाही माझीच होती आणि आजही माझीच आहे…

कदाचित

कुणाचच कुणाशिवाय अडत नाही तसं
तुझ माझंही अडणार नाही कदाचित

येतील जातील श्वास नेहमीच्या सवयीने
तुफानाची ओढ मात्र त्यांची सरेल कदाचित

बरगड्यांच्या आतलं यंत्र उघडेल झडपा नेमाने
धडधडण्याची खोड मात्र त्याची जिरेल कदाचित

नियमानुसार शास्त्राच्या तहान भूक सुद्धा लागेल
तुझ्यासाठी ताटामधला घास उरेल कदाचित

ओली होईल पावसाने आणि थंडीत कात थरथरेल
मोहरण्याची जाणीव मात्र तिची विरेल कदाचित

तारीख बदलेल दिवसागणिक सगळ सगळ तसंच होईल
रिकाम्या, सुन्न मनात ओळख माझी झुरेल कदाचित

कुणाचच कुणाशिवाय अडत नाही तसं
तुझ माझंही अडणार नाही कदाचित  

निःशब्द

तुझे म्हणावे तुझेच केवळ

असे काही एक माझे निव्वळ

 

कुणी म्हणाले तिथेच बनती

जुळती तुटती रेशीमगाठी

मी न पाहिले हात तयाचे

तुझ्या किनारी सापडले घर

 

आयुष्याच्या अंक पटावर

दिले घेतले हिशेब झाले

समर्पणाच्या वाटेवरचे 

आज पडावे पहिले पाउल

 

उलगडताना ह्रदयाची  धून

सूर कापरा कातर कातर

शब्दांची वीण उसवीत जाती 

शब्दांवाचून डोळ्यांचे तळ

 

 तुझे म्हणावे तुझेच केवळ

असे काही एक माझे निव्वळ