झालं होत फक्त एवढंच

आज यातलं काहीच दिसलं नाही
रस्ते, खड्डे
धूर, धूळ,
घाण, चिखल
बातम्या, पोस्टर्स

आज यातलं काहीच खुपलं नाही
गजर, बडबड
कलकल, आवाज
ह्याची चरबी
त्याचा माज

आज यातलं काही झालंच नाही
चिडचिड वैताग
धांदल, गडबड
त्रागा, तगमग
तडफड, कडकड
.
.
.
झालं होत फक्त एवढंच,
कालचा दिवस संपताना
तू माझ्या आणि मी तुझ्या मनावर अलगद हात ठेवला होता.

Advertisements

उसवून…

उसवून वीण निखळून गेलेत किती क्षण
बिलगून राहिलेत काळजाला
जाणा-या काळाला पुढे पाठवून

आता वर्तमानाची ठिगळ लावून शिवावी लागते काळाची गोधडी रोज

अपूर्ण

ब-याच दिवसांनी भेटतो आपण
आणि बराच वेळ जातो शब्दाला शब्द जुळवण्यात
गुंतलेल्या दो-याची टोक शोधण्यात
निघायची वेळ होते कधी कळत नाही

मग परत एकदा हरवून जायचं
जगलेले आणि न जगलेले ते सगळे क्षण गोळा करण्यात
बोलायचे आणि सांगायचे ते सगळे शब्द गोळा करण्यात
तुझ्या डोळ्यात वाचलेलं आठवून आठवून मनावर गोंदून ठेवण्यात
पुढच्या भेटी साठी…

काही नाती फक्त अपूर्ण असण्यासाठीच असतात का रे?

हिरवळ

भणंग वा-याने वाहून नेल सुकलेल बरंच काही
वाळलेल्या काटक्या, सुरकुतलेली पान आणि काही नाती सुद्धा…
आपण मात्र होतो तिथेच थांबलो

चिकटून राहिले मनावर नात्यांचे भ्रम
दगडाला चिकटून बसलेल्या शेवाळ्यासारखे   
आणि मुठीत घट्ट धरून ठेवली होता चुरगळलेला सुका पाचोळा

आता वाटत तेव्हा अधीन व्ह्यायला हव होत
वाहून जायला हव होत
आणि बरंच काही वाहून द्यायलाही हव होत

नाहीतरी हिरवळ पायाखाली होतीच कधी?
ती तर जपली होती आत आत, स्वप्नांच्या डोहात
ती तेव्हाही माझीच होती आणि आजही माझीच आहे…

कदाचित

कुणाचच कुणाशिवाय अडत नाही तसं
तुझ माझंही अडणार नाही कदाचित

येतील जातील श्वास नेहमीच्या सवयीने
तुफानाची ओढ मात्र त्यांची सरेल कदाचित

बरगड्यांच्या आतलं यंत्र उघडेल झडपा नेमाने
धडधडण्याची खोड मात्र त्याची जिरेल कदाचित

नियमानुसार शास्त्राच्या तहान भूक सुद्धा लागेल
तुझ्यासाठी ताटामधला घास उरेल कदाचित

ओली होईल पावसाने आणि थंडीत कात थरथरेल
मोहरण्याची जाणीव मात्र तिची विरेल कदाचित

तारीख बदलेल दिवसागणिक सगळ सगळ तसंच होईल
रिकाम्या, सुन्न मनात ओळख माझी झुरेल कदाचित

कुणाचच कुणाशिवाय अडत नाही तसं
तुझ माझंही अडणार नाही कदाचित  

होत का अस कधी कधी?

होत का अस कधी कधी?
तावातावाने मिटिंग मध्ये
मुद्दे बोजड मांडताना
रुणझुण रुणझुण वाजत राहतो कानामध्ये पावूस निळा?

होत का अस कधी कधी?
नितळ काचेच्या बंद खोलीत
गुप्त खलबते करताना
गर्द राईतून फांदीआडून चिडवत राहतो पक्षी खुळा ?

होत का अस कधी कधी?
कुजबुजणा-या सभ्य गृहात
वाक्जड पेले रिचवताना
अवचित अलगद मनात स्मरता तिने दिलेल्या शुभ्र कळ्या ?

होत का अस कधी कधी?…

रात्र

डोळ्यातला चंद्र
आणि मनातला अंधार घेऊन

सत्याचे भास झेलत
स्वप्नांच्या उंबरठ्यावर

निद्रेची वाट बघत
ताटकळत उभी होती रात्र

माझा सुद्धा डोळा लागला नाही ती झोपेपर्यंत.

Advertisements