सुटका

सूर्याची जरा अधिकच फाकलेली किरणं.
जणू सुटकेच्या प्रयत्नात.
पण ब-याचदा ती समाधानी दिसतात
कैदेतल माफक स्वातंत्र्य उपभोगताना
उमटत जातात खुणा कधी कधी त्यांच्या बंडाच्या
प्रकाशाच्या सावल्या जशा,
आणि मग संध्याकाळी घाई घाईने ती गोळा करतात सगळ्या सावल्या
आणि बांधून नेतात पुन्हा ,
नकोच पुरावा त्यांच्या बंडाचा, किंवा साध्या कुजबुजण्याचा सुद्धा.

त्या सगळ्या सगळ्या सावल्यांमध्ये माझी सुद्धा सावली दिसते
माझ्यातून फाकलेल्या धगधगणा-या, पोळलेल्या, किरणांसकट
तेव्हा समजते निरर्थक धडपड,
किरणांची नव्हे तर सूर्याची
स्वतःपासून सुटण्याची!

घुबड होणार?

एक होता काऊ आणि एक होती चिऊ. त्याचं चाललं होत मजेत; नेहमीचीच भांडण, रोजचेच हेवेदावे, धडे शिकवण, आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या.

आणि एक होता पोपट, एक साळुंकी सुद्धा. दिवसभर त्याची पोपटपंची आणि तीच कर्णकर्कश किंचाळण. त्या पलीकडे पोचाव अशी इच्चा नाही आणि खंतही नाही. पिंजा-यात नसून पिंजा-यातच जगणारे काहीसे.

मग एक कबुतर का नसाव? तेही होत. उबेजलेल्या वळचणीला बसून दिवसभर घुमायच, आणि घोग-या आवाजात कसलीशी भुणभुण करत रहायची.

कोणाला दिसत नसली तरी जिच्या नजरेतून कोणीही सुटत नसे अशी एक घार सुद्धा होती; उंच आभाळात. पण त्याचा उपयोग एक तर स्वतः च्या पिल्लांपुरता किंवा एखाद सावज हेरायला. बाकी तिच्या सगळ दिसण्याशी तिच्या पलीकडल्या जाणिवांचा काहीच संबध नाही.

तिथेच तळ्याच्या कडेला एक बगळा कसा दिसला नाही तुम्हाला! त्याचाही नेहमीचाच उद्योग; संन्याशाचा आव आणून ताव मारायचा.

आणि एक घुबड सुद्धा होत. अंधा-या ढोलीत डोळे बंद करून बसलेल. सगळ्यांपेक्षा वेगळ. कुरूप, अशुभ हि सगळी ठेवलेली नाव कोळून प्यायलेल. सगळ्यांच सगळ शांतपणे शोषून घ्यायचं. चेह-यावर त्याचा कुठली पुरावा दिसत नाही. फक्त दिसत नाही कि तो मुळातच असत नाही? स्थितप्रज्ञ कि काय ते. डोळ्यात काही उमटण्याचा प्रश्नच नाही. ते आत आत पाहण्यात व्यग्र. अंतर्मुख.
आणि रात्री मात्र सगळे गाढ झोपी गेल्यावर कोणालाही न दिसणार बराच काही पाहायचं.

आपण सगळेच थोडे थोडे पक्षी असतो. आपापल्या आकाशात उडणारे, आपापल्या घरट्यात राहणारे, आपल्या आपल्या पिल्लांना दाणा भरवणारे. कोणी कधी कोण व्ह्यायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न.

पण सगळ्यांनी थोड थोड घुबड नक्की व्हावं. नाही?

गुलमोहोर

तापलेल्या डांबराच्या एकलकोंड्या रस्त्यावर तुला उभं पाहिलं
पोळणा-या वा-यावर, त्या आगीच्या गोळ्याशी एकरूप होताना
तुझी सावली सुद्धा तेव्हा झाली होती लालबुंद, निखा-यासारखी.
तू असा जळत उभा होतास
आणि ते मात्र तुझ्यात बघत होते
नखशिखांत बहरलेला गुलमोहोर

चेहरे

चेहरेच चेहरे अवती भवती
नाक डोळे ओठ सारे काही
प्रत्येक चेह-यावर जागच्या जागी
सुरकुत्यांच्या नक्षी सहित,
सगळ अगदी माणसांसारख
हसरे, सुंदर, रंगीत काही
काही नेटके, मोजके, माफक
पण गुच्छ असे नाहीतच ताज्या टवटवीत फुलांचे कुठे
आपापल्या ओळखीसकट एकत्र बांधलेले, जग सुंदर करणारे..
सगळे विखुरलेले, माळेतून ओघळलेल्या मोत्यांसारखे
मोती खरेच, पाणीदार…पण आपापले अदृश्य शिंपले घेऊन फिरणारे

आणि वातावरणात भरून राहिलेले स्वर
डोळ्यातलं मृगजळ लपवता लपवता ओठातून निसटलेले…

काही दिवसच असे असतात

काही दिवसच असे असतात
विस्कटलेल्या घरात
गोंगाटाच्या घेरात
उधाणलेल्या भरात
तरीही सुरात

आपण म्हणतो दिवसभरात काहीच नाही झाल सरळ
त्याला मात्र पडत राहते अशाच अनवट क्षणांची भुरळ
आपण त्याला बसवत राहतो वेळापत्रकाच्या चौकटीत
त्याला मात्र नसत अडकायचं रोजच्या घोटीव कटकटीत

धावत राहतो आपण त्याच्या मागे,
हातात ताट आणि बोटात घास घेवून, कातावत
तो मात्र पळतो अंगणात
अर्ध्या चड्डीत, बरबटलेल्या तोंडाने
खट्याळ हसत , वेडावत

त्याला असत भिडायचं आभाळाच्या गाण्याला
आपल्या मुठीत भरायचं चांदोबाच्या नाण्याला
डोळ्या पुढचं धुक आपल्या सरतच नाही
निरागस आर्जव त्याचं दिसतच नाही

झपाटलेल्या क्षणांनी विणलेला दिवस
दिवसभर उनाडून शिणलेला दिवस
हवेसारख्या भासणा-या वेढलेल्या धुरात
किरणांचे श्वास मात्र सतारीच्या तारांत

काही दिवसच असे असतात, सुरात.

जगजीत सिंग. माझ्यापुरते..

प्यार का पहला ख़त लिखने में वक़्त तो लगता है
नए परिंदों को उड़ने में वक़्त तो लगता है
जिस्म की बात नहीं थी उनके दिल तक जाना था
लम्बी दूरी तै करने में वक़्त तो लगता है.
*******

वो ख़त के पुरजे उड़ा रहा था, हवाओ का रुख दिखा रहा था..
वो उम्र कम कर रहा था मेरी, मै साल अपने बढ़ा रहा था
*******

मेरी जिंदगी किसी और की, मेरे नाम का कोई और है
मेरा अक्स है सरे आईना, बस आईना कोई और है
*******

किसको आती है मसीहाई किसे आवाज दू?
दूरतक फैली है तनहाई किसे आवाज दू?
*******

लोग जालिम है हर एक बात का ताना देंगे, बातो बातोमे मेरा जिक्र भी ले आयेंगे
उनकी बातोका जरासा भी असर मत लेना, वरना चहरे के तासुर से समझ जायेंगे
चाहे कुछ भी हो मुलाकात न करना उनसे
मेरे बारेमे कोई बात न करना उनसे…बात निकलेगी तो फिर दूर तलक जाएगी
*******
शेहेद जिने का मिला करता ही थोडा थोडा, जाने वालो के लिये दिल नाही थोडा करते…
*******

आग का क्या है पल दो पल में लगती है, बुझते बुझते एक जमाना लगता है
*******

किती किती आणि काय काय आठवायचं? एकेका ओळीवर जीव ओवाळून टाकण्याच्या दिवसात जो आवाज हे सगळ थेट हृदयापर्यंत पोचवत होता तो आता नाही..
दिसणा-या शब्दांना न दिसणारा आत्मा देणारा आवाज आता नाही.
कधी नुसताच शांत बसलेल असताना, कधी कामाच्या गडबडीत दहा गोष्टींची यादी काढताना, कधी सिग्नलवर गाडी थांबलेली असताना खिडकी बाहेरच्या कोलाहलाला बाहेरच थोपवताना
कधी पोळ्या लाटताना, कधी अनुष्काला थोपटत निजवताना, कधी ऑफिस मध्ये मान मोडेपर्यंत काम करत नाईट मारताना, कधी रस्त्यावरची एखादी चांगली मुलगी नवा-याला किंवा मित्राला दाखवताना, कधी पेपर मधली हृदय पिळवटून टाकणारी बातमी वाचताना…
बरेच क्षण आयुष्यातले फक्त आपण एकटेच जगात असतो, आपल्य्पुरते, फक्त आपण. जगाला दिसत असतो आपण मोठ्ठ्या घोळक्यात किंवा भारी गडबडीत. पण त्याच वेळी आपल्या आत आपण एक वेगळाच क्षण जगत असतो, त्याचं आणि आपलं अस काहीतरी private असत.त्यातली खुमारी फक्त आपली असते.
अशा सगळ्या सगळ्या क्षणांमध्ये साथ दिलेल्या अवचित तरळून गेलेल्या मनात घुमत राहिलेल्या या ओळी. कोणत्याही निमित्ताशिवाय कधीही माझ्या भेटीला येवून तो क्षण फक्त माझा करून जाणा-या.

असे असंख्य क्षण माझ्या नावावर करण्यासाठी मी तुमची खूप खूप ऋणी आहे.

सर्वपित्री

दिवस: सर्वपित्री अमावास्या ( माझी आजी अमोशा म्हणायची. अमावस्येच लाडाच बोबड नाव वाटायचं.)
स्थळ: गच्ची
वेळ: दुपारचे बारा साडे बारा
वेगवेगळ्या प्रकारची पान वेगवेगळ्या ठिकाणी अंतर अंतरावर मांडून ठेवलेली.

ताट क्रमांक १: साग्रसंगीत , मीठ, लोणच, दही, कोशिंबीर, खीर, घारगे, भोपळा, गवार, कारली, इत्यादी सगळ्या माणसाने हयातीत नखाल्लेल्या भाज्या, वरण भात, पापड, पाणी….
कावळा क्रमांक १: ह्या एकाच कावळ्यात अनेक पिढ्या मधली अनेक पितर (थेट खापर खापर खापर पणजोबा किंवा त्याहून मागची ) सामावलेली असण्याची शक्यता आहे…
त्यामुळे कधी कधी एकाच कावळ्याच्या दोन विचारांमध्ये कमालीची तफावत आढळ्यास गांगरून जाऊ नये. split personality चा हा सर्वात पुरातन प्रकार असू शकेल का?

” वा आज सून बाईनी बरीच मेहनत केलीये हो, पोर घर कस छान सांभाळते, नोकरी करून तेही,”
“माझ्या हयातीत नाही कधी भरलं पान वाढलं मला ते आता खाऊ? मनात आणल तर अजूनही त्रास देवू शकतो मी. नाही शिवत जा…”
“माहित आहे हिला मला गवार नाही आवडत ते, तेव्हा सुद्धा असंच करायची मुद्दाम. शेवटी दिसायला नेहमी सासुच वाईट.”
“तरी एक बर आहे, हल्लीच्या पोरी कुठे करतात एवढ? ते शेजारच ताट पहा..मग तुला किंमत कळेल तुझ्या सुनेची”

ताट क्रमांक २: वरण भात (मूद नाही, असा तसाच), खीर, भाजी.
कावळा क्रमांक २: “उरकलं दर वर्षी प्रमाणे. अरे जरा काही मायेने कराल की नाही? त्या पेक्षा नसतं वाढलत तरी चाललं असतं, ”
” जाऊ दे ग, बरीच पान आहेत इथे, उपाशी नसतोच राहिलो. नाहीतरी आपण त्यांचे नक्की कोण, कोण येवून जेवल हे त्यांना कुठे कळणारआहे, ह्या ह्या ह्या…”

ताट क्रमांक ३: वरण भात, इत्यादी इत्यादी + ग्लुकोज बिस्किट्स आणि फरसाण
कावळा क्रमांक ३: “आहा…ह्याला म्हणतात प्रेम…थोडासा चहा सुद्धा चालला असता. ”
“कसलं प्रेम ते? त्या चहा बिस्किटांनी शुगर वाढली तुमची आणि आटोपलात.”
“आता तरी सोड ग ते नाव ठेवण… उपचार म्हणून करणा-या लोकांपेक्षा हा ओलावा हवा असतो ग, या वयात सुद्धा. ते बघ तुझ्यासाठी घारगे पणठेवलेत, कोलेस्ट्रोल ला बरे तुझ्या. ह्या ह्या ह्या”
“जळली तुमची ती थट्टा..काव काव…शिवा लवकर, त्यांना ऑफिस ला उशीर होत असेल. ”

गच्चीवरच्या ताटांचे नमुने बघून सुचलेलं हे काहीबाही. एक प्रतिक म्हणून मला हि प्रथा खूप आवडते. त्यात सत्य किती तथ्य किती ते माहितनाही. अशा ब-याच गोष्टी केवळ संस्कारांनी स्वीकारायला शिकवल्या हे मात्र खर. काढायला गेलो तर किती तरी प्रश्न, शंका निघतील. पणया दिवसाच्या निमित्ताने आपल्या पूर्वजांच निदान आपल्या आजी आजोबा, आई बाबांच्या प्रेमच, त्यागाच एक स्मरण करू शकतोच. अर्थात त्या साठी एका विशेष दिवसाची गरज नाही.
न पाहिलेले पूर्वज माहित नाही पण कधी काळी ज्यांच्याबरोबर दिवाणखान्यात बसून गप्पा मारत, TV बघत एकत्र जेवलो होतो, भाजी आमटीला नाव ठेवत तर कधी एकमेकांची मस्करी करत, त्या आपल्या स्मरणातल्या सगळ्या प्रेमळ आठवणींसाठी माझ एक पान. फरसाणबिस्कीट आणि घोटभर चहासकट.

अस होत का कधी? जुन्या खुणा बघून?

अस होत का कधी? जुन्या खुणा बघून? शेजारच्या काकांना अचानक खूप म्हातार झालेलं बघून? धुंदीत जगताना गेल्या काळाशी नाळ सांगणा-या एखाद्या खांबावर आपटून?
_________

सूर्य पिवून क्षण क्षण जिंकून दमून भागून दिवस जेव्हा
अलिशान रंगीत संध्याकाळ उशाशी घेऊन कलंडला
तेव्हा उशापायथ्याशी येऊन बसल्या गेल्या दिवसांच्या सावल्या…
काळाचे रंगीत फुटके तुकडे, kaliedoscope मधल्या सारखे
आणि काही फाटकी पानं, जुन्या डायरीतली वा-याने फडफडत आलेली.
पटकन उचलून वास घ्यावा, जोडून पाहावी पूर्ण होते का ती अर्धवट राहीलेली कविता…
हो आणि पाण्यावरचे रंग विरघळत तळाशी बसले हळू हळू आणि
वर आली काही प्रतिबिंब ओथंबलेली; जणू मागच्या जन्मातली,
तो डाव्या खांद्यावरचा तिळ बघून ओळखीचं हसणारी
सगळ सगळ कवटाळून पुन्हा उगवून यावं आणि निसटलेलं बरंच काही
बरोबर घेऊन जगावं म्हटलं तर
ती रंगीत संध्याकाळ डोळ्यापुढे मिट्ट काळोख फासून त्याच काळोखात हरवून गेली

आणि शरीराच्या कुठल्याशा भागात असणारी मन नावाची जागा हळवी हळवी होत रात्रभर ठसठसत राहिली.

कायद्याने ते समान…

तो ‘तो’, ती ‘ती’
पण कायद्याला काय त्याच?
कायद्याने ते समान.

ती पहाटे गजर लावून उठते.
तो सकाळी ओव्या ऐकून
गजर ‘तो’, ओवी ‘ती’
हिशोब तसा बरोबरच
कायद्याने ते समान.

तिची धावपळ, त्याचा आरडओरडा
तिची आवराआवर, त्याचा पसारा
ती करते त्रागा, तो घालतो समजूत
त्रागा ‘तो’ समजूत ‘ती’
हिशोब पुन्हा बरोबर
कायद्याने ते समान

तिची नोकरी, त्याचा जॉब
तिची अब्रू त्याचा आब
संसाराचा गाडा ‘तो’ हाकतो
संसाराचा गाडा ‘ती’ ओढते
पण कायद्याला काय त्याच?
कायद्याने ते समान

तिच्या पोटी त्याचा अंश
ती वाढवते त्याचा वंश
वंशाचा दिवा देवाच्या ताटी
धनाची पेटी व्यवहारासाठी
दिवा ‘तो’ पेटी ‘ती’
पण कायद्याला काय त्याच?
कायद्याने ते समान

न्याय देणारी देवता ‘ती’
निर्णय घ्यायला लावणारा कायदा मात्र ‘तो’
त्याच्या लेखी फरक फक्त एका रेषेचा
ताठ उभ्या मात्रेचा आणि वाकलेल्या वेलांटीचा
त्याच काय घेऊन बसलात एव्हढस?
कायद्याने ते समान…

janlokpaal…aani mi

हात पाय नाक डोळे नसलेला एक प्राणी जंगलात शिरला
डोक्याच्या जागी एक भला मोठा पोकळ बुडबुडा, संतापाने भरलेला
शब्दहीन आक्रोशाचा लोट निव्वळ दिसत होता
पाय फुटलेल्या वाटांवरून दिशाहीन वाहत होता
डोक्यावर त्याच्या कुणा संताची पालखी होती
गडबडलेल्या वनराजाला शिकार हि नवखी होती
सावज टप्प्यात असून सुद्धा झेप त्याची पोचत नव्हती
कोल्हया लांडग्यांची नख सुद्धा गोळ्याला त्या डाचत नव्हती
गुहेमध्ये जाऊन त्याने काही वर्ष चाळली
काळ थोडा मागे करून युग थोडी पाहिली
किडे मुंग्या हरणं ससे चिरडलेली अनेक मनं
इतिहासाच्या पुस्तकातली रक्तबंबाळ किती पानं
पुस्तकात वेदनेचा चेहरा नव्हता कुठेच छापला
सनावल्यांच्या गर्दीमध्ये इतिहास आमचा तेव्हाच फसला
काही चुका गाळ्ल्या तरी गाळ तसा बराच होता
पालखीतल्या संताचा चेहरा बराच खरा होता
वनराजाची आता कसोटी वेसण त्याला घालायचीय
शिकार मात्र या वेळी रक्ताशिवाय करायचीय..